Pro Kabaddi League: यु मुम्बाचा बंगाल वॉरियर्सवर संघर्षपूर्ण विजय! बंगाल वॉरियर्सच्या तोडातून काढून घेतला घास

PKL 11: सामन्याच्या उत्तरार्धात मनजीतच्या खोलवर आणि वेगवान चढायाची जोड घेत यु मुम्बाच्या बचावपटूंनी प्रो कबड्डीच्या ११ पर्वातील शनिवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सच्या तोडातून विजयाचा घास काढून घेतला.

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 26, 2024, 09:40 PM IST
Pro Kabaddi League: यु मुम्बाचा बंगाल वॉरियर्सवर संघर्षपूर्ण विजय! बंगाल वॉरियर्सच्या तोडातून काढून घेतला घास title=

Bengal Warriorz Vs U Mumba: सामन्याच्या उत्तरार्धात मनजीतच्या खोलवर आणि वेगवान चढायाची जोड घेत यु मुम्बाच्या बचावपटूंनी प्रो कबड्डीच्या ११ पर्वातील शनिवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सच्या तोडातून विजयाचा घास काढून घेतला. बचावाच्या आघाडीवर झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा प्रतिकार ३१-३० असा मोडून काढला.

पूर्वार्धात पिछाडीवर राहिल्यानंतर यु मुम्बाने उत्तरार्धात सामन्याला चांगला वेग दिला. यामध्ये मनजीतच्या चढायांचा मोठा वाटा होता. त्याला रोहित यादवची चांगली साथ मिळाली. त्यातही डावा कोपरारक्षक सोमवीरने केलेल्या अचूक पकडींमुळे यु मुम्बाला वर्चस्व मिळविणे शक्य झाले. उत्तारर्धात बंगालच्या मयूर कदमने बचावातील जोश कायम ठेवला होता. पण, त्यांच्या चढाईपटूंना उत्तरार्धात आलेले अपयश त्यांच्यासाठी धोक्याचे ठरले. मनजीतने चढाईचे ७, तर सोमवीरने बचावात ५ गुणांची कमाई केली. बंगालकडून मनिंदर सिंगने चढाईचे ८, तर मयूर कदम (५) आणि नितेश कुमार (४) यंनी बचावात अचूक कामगिरी करून आव्हान राखण्याचे प्रयत्न केले.  बचावाच्या आघाडीवर झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा प्रतिकार ३१-३० असा मोडून काढला.

 

सामन्याच्या मध्यंतराला बंगाल वॉरियर्सने  बचावाच्या आघाडीवर वर्चस्व राखताना २०-१३ अशी आघाडी घेतली होती. पूर्वार्धात एक लोण चढवत बंगालने आपला धडाका कायम राखला होता. कर्णधार फझल अत्राचली आणि नितेश कुमार या बचावपटूंचा यात मोठा वाॉटा होता. मनिंदरसिंगनेही चढाईपटू म्हणून आपली कामगिरी चोख बजावली होती. यु मुम्बाच्या खेळाडूंना लय गवसली नव्हती.