धोनीची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार का? ही सीरिज ठरवणार

बीसीसीआय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करणार आहे.

Updated: Dec 24, 2018, 04:36 PM IST
धोनीची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार का? ही सीरिज ठरवणार title=

मुंबई : बीसीसीआय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करणार आहे. याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीही भारतीय टीमची निवड होऊ शकते. या सीरिजसाठीची भारतीय टीम पुढच्या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपवर लक्ष ठेवूनच निवडली जाणार आहे. आता भारतीय टीममध्ये प्रयोग होणार नाहीत, असं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे. त्यामुळे धोनीची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार का नाही, ते या सीरिजमधल्या त्याच्या फॉर्मवर अवलंबून असणार आहे.

धोनीचं वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममधलं स्थान पक्क होतं. पण गेल्या काही कालावधीपासून धोनीला बॅटिंगमध्ये चमक दाखवता आलेली नाही. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं विजय मिळवला होता. जगातला सर्वोत्तम फिनिशर अशी ओळख असलेल्या धोनीला गेल्या काही सीरिजमध्ये तशी कमाल दाखवता आलेली नाही.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीची टीममध्ये निवड झालेली नव्हती. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये धोनी खेळला होता. यातल्या २ मॅचमध्ये धोनीला बॅटिंग मिळाली तेव्हा त्यानं ७ आणि २३ रन केले. मागच्या २ वर्षांमध्ये धोनीनं ४९ मॅचच्या ३५ इनिंगमध्ये ८०.८३च्या सरासरीनं १,०६३ रन केले. यामध्ये त्याची सरासरी ४४.२९ एवढी आहे. मागच्या २ वर्षांमध्ये धोनीनं १ शतक आणि ६ अर्धशतकंही झळकावली आहेत.

२०१८ मध्ये धोनीच्या फक्त २ सिक्स

२०१८मध्ये धोनीनं २० मॅचच्या १३ इनिंगमध्ये २५ च्या सरासरीनं २७५ रन केले आहेत. यामध्ये त्याला एकही शतक किंवा अर्धशतक करता आलेलं नाही. तसंच या वर्षात धोनीला फक्त २ सिक्स मारता आल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक सिक्स मारण्याचं रेकॉर्ड धोनीच्याच नावावर आहे. धोनीनं आत्तापर्यंत २१८ सिक्स मारले आहेत.

धोनीची सर्वोत्कृष्ट विकेट कीपिंग

धोनीला बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी तो भारताचा सध्या तरी सर्वोत्कृष्ट विकेट कीपर आहे. एवढच नाही तर धोनी मैदानामध्ये कोहली आणि इतर खेळाडूंचा सल्लागार म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजवत आहे. डीआरएस घेण्याचे धोनीचे अंदाज कधीच चुकत नाहीत. एवढच नाही तर भारतीय टीममधले स्पिनरही त्यांच्या यशामागे धोनीचं योगदान असल्याचं सांगतात.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीला संधी?

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीला संधी देण्यात येणार का नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. याआधी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीला टीममधून वगळण्यात आलं होतं. धोनीऐवजी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतची टीममध्ये निवड करण्यात आली होती.

भारताचं वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजला १२ जानेवारीपासून सिडनीतून सुरुवात होईल. यानंतर दुसरी वनडे १५ जानेवारीला ऍडलेडमध्ये आणि शेवटची आणि तिसरी वनडे १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये होईल. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. ही सीरिज २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅचची सीरिज होईल. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या या सीरिजमध्ये धोनीपुढे पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतण्याचं आव्हान असणार आहे.