बेलग्रेड : जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावरचा आणि सर्बियाचा अव्वलमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांपूर्वी जोकोविच दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
सर्बिया आणि क्रोएशियात आयोजित प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर नोवाक जोकोविच याची चाचणी घेतली गेली होती. त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणे नसताना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी सर्बियन राजधानीत क्वारंटाईन करण्यात आले होते. प्रदर्शनीय स्पर्धेत सहभागी झालेल्या ग्रिगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक, व्हिक्टर ट्रोईकी यांनाही कोरोना झाल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते.
जोकोविचने सोमवारी कोरोनाची चाचणी केली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या चाचणीचा रिपोर्ट आला. तसेच जोकोविचची पत्नीला देखील कोरोना झाला होता. महत्वाची बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. जोकोविचने एड्रिया टूरमध्ये सहभाग घेतला होता. या टूरमध्ये सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.