स्टेडियममध्ये जाऊन लाईव्ह मॅच पाहणं हे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा तिकिटांची भरपूर मागणी, वाढलेली किंमत इत्यादींमुळे अनेकांचं हे स्वप्न स्वप्न राहतं. मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये फ्रीमध्ये लाईव्ह टेस्ट मॅच पाहण्याची संधी चालून आली आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात टेस्ट सामना खेळवण्यात येणार असून हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून कोणतेही तिकीट आकारले जाणार नाही.
9 ते 13 सप्टेंबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. अफगानिस्तानमधील वातावरण काही वर्षांपासून सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं नसल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ भारतातील ग्रेटर नोएडा येथे सराव करत आहे. सध्या हे त्यांचं होम ग्राउंड आहे. या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडची टीम भारतात दाखल झाली आहे.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या टेस्ट टीम रँकिंगमध्ये न्यूझीलंड 5 व्या क्रमांकावर आहे तर अफगाणिस्तान ही 12 व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट मॅच फ्रीमध्ये पाहण्यासाठी 4 सप्टेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. तसेच तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्यतिरिक्त चार वेगवेगळ्या जागांवर रजिस्ट्रेशन सुरु आहे.
ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने टेस्ट मॅच यशस्वीपणे पार पडावी यासाठी चांगली व्यवस्था केली असून खेळाडूंच्या सुरक्षेसाठी 600 पोलीस तैनात असणार आहेत. हे पोलीस खेळाडूंना हॉटेलपासूनत ते स्टेडियमपर्यंत घेऊन जातील. त्याचबरोबर स्टेडियममध्ये व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी प्रेक्षकांसाठी विशेष आसनव्यवस्था असलेले 6 वेगवेगळे सेक्टर तयार करण्यात आले आहेत.
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या टेस्ट सामन्यानंतर 19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. 19 ते 23 सप्टेंबर पर्यंत टेस्ट सिरीजचा पहिला सामना एम चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असून 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना उत्तर प्रदेश येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येईल. त्यानंतर 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत- बांगलादेश यांच्यात टी 20 सिरीज खेळवली जाईल. मात्र हे सामने चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन फ्रीमध्ये पाहता येणार नाहीत. मात्र मोबाईल यूजर्स हे सामने जिओ सिनेमावर मोफत पाहू शकतात.