मुंबई : माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने क्रिकेटच्या मैदानावर ठोकलेले 6 सिक्स कोणालाही विसरता येणार नाही. 2007 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने इंग्लंडविरूद्ध हा पराक्रम केला होता. युवराजशिवाय इतरही अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी हे काम केले आहे. अलीकडेच, आणखी एका खेळाडून 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले आहेत.
एका स्थानिक स्पर्धेत आयर्लंडच्या खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले. जॉन ग्लास असे या फलंदाजाचे नाव आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, ग्लास केवळ 21 वर्षांचा आहे. अंतिम सामन्यात क्रेगाघोविरूद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर ग्लासने एकापाठोपाठ एक सिक्स मारले आणि अंतिम सामना जिंकला.
शेवटच्या षटकात 6 षटकार ठोकणार्या जॉन ग्लासने या सामन्यात नाबाद 87 धावांची खेळी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्रेगाघोच्या संघाने 7 गडी गमावून 147 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बॉलिमेनानेही 7 गडी गमावून 148 धावा केल्या. ग्लासने 6 षटकार मारत सामना संपविला तेव्हा बॉलिमेनाला शेवटच्या षटकात 35 धावांची गरज होती. हा सामना जिंकल्यानंतर बल्लीमेनाच्या टीमने जोरदार उत्सव साजरा केला, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्लासच्या मोठ्या भावानेही चमत्कार केले
या सामन्यात जॉनने 6 षटकार मारण्याआधी त्याचा मोठा भाऊ सॅम ग्लासनेही उत्तम कामगिरी केली. सॅमने त्याच्या गोलंदाजीत हॅटट्रिक घेतली. या सामन्यात त्याने फक्त 5 धावा देत 3 गडी बाद केले. या सामन्यात दोन्ही भावांच्या अद्भुत कामगिरीमुळे संघ विजयी झाला.