Ranji Trophy: शतक ठोकूनही रोहित शर्मासाठी वगळलं; 17 वर्षीय खेळाडू म्हणाला 'तुझी फलंदाजी पाहून...'

रणजीमध्ये रोहित शर्माला संघातून खेळता यावं यासाठी मुंबईने 17 वर्षीय आयुष म्हात्रेला जम्मू काश्मीरविरोधातील सामन्यातून वगळलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2025, 05:36 PM IST
Ranji Trophy: शतक ठोकूनही रोहित शर्मासाठी वगळलं; 17 वर्षीय खेळाडू म्हणाला 'तुझी फलंदाजी पाहून...' title=

सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईकडून रणजी खेळत आहे. दरम्यान रोहित शर्माला संघात जागा करण्यासाठी 17 वर्षीय आयुष म्हात्रेला संघातून वगळण्यात आलं. मागील सामन्यात शतक ठोकलेलं असतानाही रोहित आयुष म्हात्रेला बेंचवर बसवण्यात आलं. आयुष म्हात्रेने आतापर्यंत एक खेळी केली आहे. ज्यामध्ये त्याने 6 सामन्यांमध्ये 40.09 च्या सरासरीने 441 धावा केल्या आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालसारखे वरिष्ठ भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये परतल्यामुळे त्यांना बेंचवर परतावं लागलं.

रोहित शर्मा जम्मू काश्मीरविरोधातील सामन्यातही अपयशी ठरल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मुंबई संघातून खेळण्यासाठी आयुष म्हात्रेसारख्या कौशल्यवान खेळाडूचा बळी दिल्याने त्याच्यावर टीका होत आहे. मात्र मुंबईच्या खेळाडूचा रोहित शर्मावर कोणताही आक्षेप नसून, तो आपला आदर्श असल्याचं म्हटलं आहे. 

"माझ्या आदर्श खेळाडूला फलंदाजी करताना क्रिकेट खेळण्यास सुरुवात करण्यापासून ते ड्रेसिंग रुम शेअऱ करण्यापर्यंत, हे अविश्वसनीय आहे. मला अनके गोष्टी शिकायला मिळत आहे, ज्या पुढे जाण्यास मदत करतील," असं आयुष म्हात्रेने म्हटलं आहे. त्याने इंस्टाग्रामला रोहित शर्मासोबतचा फोटोही शेअर केला आहे. 

मुंबईच्या शेवटच्या रणजी ट्रॉफी सामन्यात आयुष म्हात्रेने सर्व्हिसेसविरुद्ध 116 धावा केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. अ श्रेणीत पदार्पण केल्यापासून त्याने 65.42 च्या सरासरीने 458 धावा केल्या आहेत. रोहितच नाही तर रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणारे इतर वरिष्ठ भारतीय खेळाडू देखील अपयशी ठरले. यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे किंवा अगदी कर्णधार अजिंक्य रहाणे, जो आता राष्ट्रीय संघात नाही तेदेखील त्यांच्या कामगिरीत अपयशी ठरले.

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने ठोकलेल्या शतकामुळे मुंबईला जम्मू-काश्मीरविरुद्ध चांगली धावसंख्या उभारती आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसाठी स्थानिक क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज विराट कोहली देखील पुढील सामन्यात रणजी ट्रॉफी खेळणार आहे.