Ranji Trophy 2025 : 23 फेब्रुवारीपासून रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यांना सुरुवात झाली आहे. देशभरातील विविध मैदानांवर रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy 2025) सामने खेळवले जात असून मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर (Mumbai VS Jammu Kashmir) यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात मुंबई संघात भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले दिग्गज खेळाडू होते. परंतु मुंबई संघाकडून त्यांच्या होम ग्राउंडवर पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. रणजी ट्रॉफीच्या सहाव्या राउंडमध्ये मुंबईवर जम्मूने 5 विकेट्सने विजय मिळवला.
जम्मू काश्मीरला सामन्याच्या चौथ्या इनिंगमध्ये विजयासाठी 205 धावांचं टार्गेट होतं. फलंदाजांसाठी कठीण असलेल्या या विकेटवर जम्मू काश्मीरच्या फलंदाजांनी मैदानात जबरदस्त फलंदाजी करून 49 व्या ओव्हरला विजयाचं टार्गेट पूर्ण केले. सलामी फलंदाज शुभम खजुरियाने 45, विवरांत शर्माने 38, आबिद मुश्ताकने 32 धावा केल्या. तर मुंबईच्या शम्स मुलानीने 4 विकेट घेतले. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, शिवम दुबे असे टीम इंडियाचे स्टार खेळाडू असताना मुंबईचा संघ पराभूत झाला.
जम्मू काश्मीरच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये मुंबईला 120 धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर फलंदाजांनी 206 धावा करून 86 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगच्यावेळी 101 धावांवर मुंबईच्या 7 विकेट्स पडल्या होत्या. त्यावेळी शार्दूल ठाकूर संघाचा संकटमोचक ठरला आणि त्याने तनुश कोटियान सोबत मिळून 8 व्या विकेटसाठी 184 धावांची पार्टनरशिप केली. शार्दूल ठाकूरने 135 बॉलमध्ये 119 धावा करून शतक ठोकले. कोटियानने 62 धावांचे योगदान दिले. मात्र, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मुंबईच्या उरलेल्या तीन विकेट 5 धावांतच पडल्या. त्यामुळे जम्मू-काश्मीरला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट घेणारा युधवीर सिंग चरक याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, कर्ष कोठारी
पारस डोगरा (कर्णधार), शुभम खजूरिया, कन्हैया वधावन (विकेटकीपर), आकिब नबी, विवरांत शर्मा, यावर हसन, अब्दुल समद, आबिद मुश्ताक, युद्धवीर सिंह, उमर नजीर मीर, वंशज शर्मा