नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आजच्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
सौरव गांगुली हा केवळ त्याच्या बेधडक निर्णयांमुळेच नाही तर नवी तरूणांना संधी देण्यासाठीही ओळखलं जातं. गांगुलीच्या आधी टीम इंडियाला ‘घरातील वाघ’ असं म्हटलं जायचं. पण गांगुलीने परदेशात अनेक सामने जिंकत टीम इंडियाचा हा डाग धुवून काढला. तोच टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलं.
गांगुलीने आपल्या करिअरचा शेवट ११३ टेस्ट सामन्यांमध्ये ७२१२ रन्स केल्यानंतर केली. त्यात १६ शतकांचाही समावेश आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार गांगुलीने ४९ टेस्ट सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. आणि २१ सामने जिंकले. गांगुलीने आपल्या करिअरची शेवटची टेस्ट नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळली होती.
गांगुलीची ही शेवटची टेस्ट यादगार करण्यासाठी तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने एक खास गिफ्ट दिलं होतं. गांगुलीने ९ नोव्हेंबर २००८ ला शेवटची टेस्ट खेळी केली. हा टेस्ट सामना ६ नोव्हेंबर २००८ ते १० नोव्हेंबर २००८ पर्यंत खेळला गेला होता. धोनीने दादाच्या करिअरच्या शेवटच्या टेस्टचं नेतृत्व सौरव गांगुलीकडेच दिलं होतं.
धोनीचं हे गिफ्ट केवळ दादासाठी यादगार नव्हतं तर सा-या जगासाठी यादगार होतं. धोनीच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागतही केलं होतं. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करत ४४१ रन्स केले होते. या खेळीत सौरव गांगुलीने ८५ रन्सची शानदार खेळी केली होती.
दुस-या इनिंगमध्ये टीम इंडियाने २९५ रन्स केले. यावेळी दादा आऊट झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुस-या इनिंगसाठी फलंदाजी करण्यासाठी आली. ९ विकेट गेल्यावर धोनी दादाचा सन्मान म्हणून टीमचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलं. याच सामन्यातून दादाने निवृत्ती घेतली.