वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून यावेळी अनेक वाद निर्माण झाले आहेत. अँजेलो मॅथ्यूसच्या टाइम आऊटपासून ते ग्लेन मॅक्सवेलने मैदानातील रोषणाईवर केलेली टीका यामुळे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. पण यावेळी मैदानाबाहेरील काही वक्तव्यांमुळेही मोठे वाद निर्माण होत आहेत. यातील एक विधान पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हसन राजाने केलं होतं. ABN News वरील चर्चेत बोलताना हसन राजा याने भारतीय गोलंदाजांना दुसरा चेंडू दिला जात असावा अशी शक्यता व्यक्त करताना आयसीसीने चौकशी कऱण्याची मागणी केली होती. त्यावर आता भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे.
"आम्हाला समजत नाही आहे की, हे फलंदाज इतर संघांविरोधात चांगले खेळतात. पण जेव्हा भारतीय संघातील मोहम्मद शमी, सिराज गोलंदाजी करतात तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेच्या अॅलन डोनाल्ड आणि मखाया यांच्यासारखे वाटतात. तेव्हा चेंडूच्या एका बाजूला चमक असायची आणि चेंडू स्विंग होत असे. पण आता तर प्रत्येक डावानंतर चेंडू बदलतात असं वाटत आहे. आयससी, अम्पायर्स, थर्ड अम्पायर किंवा बीसीसीआय हे चेंडू देत असेल तर त्याची पाहणी झाली पाहिजे," असं हसन राजा म्हणाला होता. हसन राजाने फक्त चेंडूच नाही तर डीआरएसवरही शंका उपस्थित केली होती.
ICC Might Give Different Ball to Indian Bowlers thats why they are Getting Seam and Swing More Than Others.Ex Test Cricketer Hasan Raza.#CWC23 #INDvSL pic.twitter.com/7KCQoaz0Qs
— Hasnain Liaquat (@iHasnainLiaquat) November 2, 2023
हसन राजा याच्या आरोपांवर आता भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीही व्यक्त झाला आहे. मोहम्मद शमीने इंस्टाग्रामला स्टोरी शेअर करत हसन राजाला सुनावलं आहे. त्याने म्हटलं आहे की, "काहीतरी लाज बाळगा यार, तुम्ही इतर बकवास गोष्टींपेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करा. दुसऱ्याच्या यशाचा कधीतरी आनंद घ्या. छी य़ार..ही आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा आहे, तुमची स्थानिक स्पर्धा नाही. तुम्ही नक्की खेळाडूच होता ना".
"वसीम भाईने इतकं समजावून सांगितलं तरीही..हाहाहाहाहा...आपल्या वसीम अक्रमवरही तुम्हाला विश्वास नाही का. आपलीच स्तुती करण्यात व्यग्र आहेत हे साहेब," असा टोला मोहम्मद शमीने लगावला आहे.
हसन राजाच्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या विधानावर वसीम अक्रमनेही नाराजी जाहीर केली होती. "मी गेल्या दोन दिवसांपासून याबद्दल वाचत आहे. जे इतरांना वाटत आहे तेच मला वाटत आहे. मलाही ऐकून मजा येत आहे. डोक्याचा वापर तर अजिबात करत नाही आहेत. तुम्ही फक्त स्वत:ची नाही तर आमचीही लाज काढत आहात," असं वसीम अक्रमने सुनावलं होतं.