मुंबई : मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादव आहे. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती.
यानंतर धर्मशाला येथे कुंबळेने आपला हट्ट कायम राखत संघात कुलदीपला घेतले. त्यावेळी विराटला कुलदीपला घेऊन मैदानात उतरावे लागले होते. ही टेस्ट भारताने जिंकली. त्यात कुलदीपने चार विकेट घेतल्या होत्या.
कुंबळेचा हा अनुभव होता. पण विराट याला आपला पराभव समजून मनात ठेवून बसला. आतल्या आत दोघांमध्ये खूप अंतर वाढत गेले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हा तणाव खूप वाढला आणि कुंबळेने वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
२२ वर्षाचा चायनामन कुलदीप यादवला वेस्ट इंडिजविरूद्ध निळी जर्सी परिधान करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात पावसामुळे गोलंदाजीची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपली फिरकी चांगली चालवली.
या वर्षी मार्चमध्ये धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्टमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय करीअरची सुरूवात करणाऱ्या कुलदीपने पहिल्या डावात ४ विकेट घेऊन आपला प्रभाव सोडला होता.