कुलदीप यादववरून कुंबळेशी भांडला होता विराट, आता त्याची करतो प्रशंसा

वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कुलदीप यादवचे कर्णधार विराट कोहलीने प्रशंसा केली होती. कुलदीप हा तोच चायनामन आहे ज्याच्यावरून कोहली आणि कुंबळे यांच्या भांडणाला सुरूवात झाली होती. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 26, 2017, 07:56 PM IST
कुलदीप यादववरून कुंबळेशी भांडला होता विराट, आता त्याची करतो प्रशंसा  title=

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कुलदीप यादवचे कर्णधार विराट कोहलीने प्रशंसा केली होती. कुलदीप हा तोच चायनामन आहे ज्याच्यावरून कोहली आणि कुंबळे यांच्या भांडणाला सुरूवात झाली होती. 

कुंबळेला कुलदीप संघात हवा होता पण विराट त्याला विरोध करत होता, पण आता तोच कुलदीप खेळल्यावर विराट त्याच्याबद्दल भरभरून बोलत आहे. 

मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना विराट म्हटला, फलंदाज आक्रमक व्हायला लागतो तेव्हा कुलदीप आपल्या गोलंदाजीची गती कमी करतो. त्यामुळे तो फलंदाजाला मात देऊ शकतो. कुलदीप ज्यापद्धतीने गोलंदाजीत बदल करतो तो कमाल आहे. मी आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीचा सामना केला आहे, त्याच्या चेंडूपासून वाचणे अवघड आहे, खास करून ड्राय विकेटवर... ड्राय पीचवर तो आणखी खतरनाक होतो....

कुलदीप जेव्हा चेंडूच्या सीमचा वापर करून चेंडूला दोन्ही दिशांना स्पीन करू शकतो. त्याला खेळणे अवघड असते. साधारणपणे स्पीन गोलंदाज आतल्या बाजूला स्पीन करण्यासाठी चेंडूची सीम वरच्या बाजुला ठेवतात आणि गुगलीसाठी क्रॉस सीमचा वापर करतात. पण कुलदीप दोन्ही प्रकारचे स्पीन गोलंदाजी या क्रॉस सीमने करू शकतो. त्यामुळे त्याचा हात पाहून चेंडूच्या स्पीनचा अंदाज लावणे कठीण असते, असेही कोहलीने कुलदीपबद्दल सांगितले. 

कोहलीने वर्ल्ड कपबद्दल बोलताना सांगितले की, आयसीसी वर्ल्ड कप २०१९ साठी आमच्याकडे १५ खेळाडू आहेत. तसेच आमच्याकडे आणखी १० ते १२ खेळाडू आहेत. त्यांना पुढील दोन वर्षात संधी देण्यात येईल. दबावाच्या परिस्थितीत ते कशी कामगिरी करतात त्यावर लक्ष दिले जाणार आहे. आता हे पाहिले पाहिजे की मध्यक्रमासाठी आमच्याकडून असा कोणता खेळाडू आहे जो प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकू शकतो. आम्हांला या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही विराटने सांगितले. 


कोहलीने हट्ट सोडला आणि कुलदीपचे स्वप्न पूर्ण झाले... 

२२ वर्षाचा चायनामन कुलदीप यादवला वेस्ट इंडिजविरूद्ध निळी जर्सी परिधान करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात पावसामुळे गोलंदाजीची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपली फिरकी चांगली चालवली. 

या  वर्षी मार्चमध्ये धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्टमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय करीअरची सुरूवात करणाऱ्या कुलदीपने पहिल्या डावात ४ विकेट घेऊन आपला प्रभाव सोडला होता. 


कुंबळे-विराटच्या भांडणाची सुरूवात कुलदीपवरून... 

मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादव आहे.  या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता.  तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती. 

यानंतर धर्मशाला येथे कुंबळेने आपला हट्ट कायम राखत संघात कुलदीपला घेतले. त्यावेळी विराटला कुलदीपला घेऊन मैदानात उतरावे लागले होते. ही टेस्ट भारताने जिंकली. त्यात कुलदीपने चार विकेट घेतल्या होत्या. 

कुंबळेचा हा अनुभव होता. पण विराट याला आपला पराभव समजून मनात ठेवून बसला. आतल्या आत दोघांमध्ये खूप अंतर वाढत गेले.  चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हा तणाव खूप वाढला आणि कुंबळेने वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला.