अंडरसनचा विक्रम, एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताला ५ धक्के देणाऱ्या जेम्स अंडरसननं दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला धक्के दिले. 

Updated: Aug 12, 2018, 05:57 PM IST
अंडरसनचा विक्रम, एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर title=

लंडन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताला ५ धक्के देणाऱ्या जेम्स अंडरसननं दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला धक्के दिले. दुसऱ्या इनिंगमध्ये अंडरसननं मुरली विजयला शून्यवर आऊट केलं. पहिल्या इनिंगप्रमाणेच विजय दुसऱ्या इनिंगमध्येही शून्यवरच आऊट झाला. दोन्ही इनिंगमध्ये अंडरसननंच मुरली विजयची विकेट घेतली. पण दुसऱ्या इनिंगमध्ये मुरली विजयची विकेट घेतल्यानंतर अंडरसननं विक्रमाला गवसणी घातली. अंडरसन एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर ठरला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात अंडरसननं हे रेकॉर्ड केलं आहे. मुरली विजयची विकेट अंडरसनसाठी टेस्ट क्रिकेटमधली ५५०वी विकेट आहे.

एकाच मैदानात १०० विकेट घेणारा अंडरसन दुसरा बॉलर बनला आहे. याआधी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर हे रेकॉर्ड आहे. मुरलीधरननं कोलंबो, केंडी आणि गेल या मैदानात प्रत्येकी १०० पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत.

दुसरी टेस्ट मॅच सुरु व्हायच्या आधी लॉर्ड्सच्या मैदानात अंडरसनच्या नावावर ९४ विकेट होत्या. पण पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पहिली विकेट घेऊन अंडरसननं विकेटचं शतक पूर्ण केलं.

भारताकडून एका मैदानात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेनं दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात ७ मॅचमध्ये ५८ विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये १० विकेट घ्यायचा विक्रम कुंबळेनं दिल्लीच्याच मैदानात केला होता.

एकाच मैदानात सर्वाधिक विकेट घेणारे बॉलर 

खेळाडू                    देश           मैदान         मॅच            विकेट  

मुथय्या मुरलीधरन    श्रीलंका        कोलंबो        २४             १६६

मुथय्या मुरलीधरन     श्रीलंका       केंडी           १६             ११७ 

मुथय्या मुरलीधरन     श्रीलंका        गेल            १५              १११ 

जेम्स अंडरसन           इंग्लंड       लॉर्ड्स         १८             १०० 

रंगना हेराथ               श्रीलंका        गेल          १८              ९९