मुंबई : आयपीएल २०१८चे बिगुल वाजलेय. गुरुवारी सर्व संघांनी नव्या सीझनसाठी काही खेळाडूंना संघात कायम ठेवले. यात अनेक आश्चर्यकारक निर्णयही समोर आले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा आपली जुनी टीम चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतलाय. त्याच्यासह सुरेश रैना आणि रवींद्र जडेजाचेही सीएसकेमध्ये पुनरागमन झालेय.
धोनीचे हे पुनरागमन अनोखे असेच म्हणावे लागेल. ४ जानेवारी २०१७मध्ये धोनीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले होते. धोनीने आधीच कसोटीमधून निवृत्ती घेतली होती. ४ जानेवारी २०१७मध्ये धोनीने वनडे आणि टी-२०चे कर्णधारपदही सोडले. त्यानंतर बरोबर वर्षभरानंतर ४ जानेवारी २०१८मध्ये धोनी पुन्हा कर्णधारपदाच्या भूमिकेत परतलाय.
Thakida thakida thakida Thala @msdhoni!#ReturnOfTheSuperKings#SummerIsComing #WhistlePodu #goosebumps pic.twitter.com/hnkcXN6QOv
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 4, 2018
चेन्नई सुपर किंग्जने याआधीच घोषणा केली होती की चेन्नईचा कर्णधार धोनीच राहणार आहे. २०१७ मध्ये धोनी पुण्याच्या संघाकडून खेळला होता. मात्र तो कर्णधार नव्हता. स्टीव्हन स्मिथने पुण्याचे नेतृत्व केले होते. मात्र यंदाच्या हंगामात तो पुन्हा कर्णधार म्हणून परततोय. त्यामुळे आयपीएलच्या मैदानावर पुन्हा कूल धोनीचा जलवा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. धोनीने आयपीएलमधील एकूण १४३ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेय. यात त्याने ८३ सामन्यांत विजय मिळवलाय.
धोनीला रिटेन केल्यानंतर सीएसकेने धोनीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. यात तो करारावर सही करताना दिसतोय. धोनीला १५ कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलेय. तर विराट कोहलीला आरसीबीने सर्वाधिक १७ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलेय.