'गोलंदाजांना भोगावं लागत आहे,' सुनील गावसकरांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'मी इतक्यांदा सांगतोय पण...'

IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात फलंदाजांनी वर्चस्व राखलं असून, जवळपास प्रत्येत दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा ठोकल्या जात आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) संतापले असून बीसीसीआयला सुनावलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2024, 06:08 PM IST
'गोलंदाजांना भोगावं लागत आहे,' सुनील गावसकरांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'मी इतक्यांदा सांगतोय पण...' title=

IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात पूर्णपणे फलंदाजांनी वर्चस्व राखलं आहे. 35 सामन्यांपैकी 15 वेळेला प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामधील पाच वेळा तर 250 चा आकडा गाठला गेला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाकडे सर्वात स्फोटक फलंदाज असून त्यांनी 3 वेळा ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये गोलंदाजांची धुलाई होत असताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेन याने ही त्यांच्यासाठी चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र संताप व्यक्त केला असून, बीसीसीआयला गोलंदाजाचं रक्षण करा असं सुनावलं आहे. 

शनिवारी सनरायजर्स हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 266 धावा केल्या. यामधील 125 धावा पॉवरप्लेमध्ये ठोकण्यात आल्या. ट्रेविस हेडने तर 32 चेंडूत 89 धावा करत संघाला स्फोटक सुरुवात करुन दिली. फलंदाजांच्या या वर्चस्वावर सुनील गावसकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. गोलंदाजांचं रक्षण कशाप्रकारे करु शकतो यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला सल्ला दिला आहे. 

चौकाराची सीमा आणखी थोडी मागे ढकलली जाऊ शकते असं सुनील गावसकर यांनी अंजूम चोप्राशी संवाद साधताना सांगितलं. जाहिरात बोर्ड आणि चौकाराची सीमा यामधील अंतर दाखवताना सुनील गावसकर यांनी छोट्या मैदानांमध्ये ही रेषा मागे ढकलू शकतो असं सांगितलं. 

“मी क्रिकेटच्या बॅटमध्ये कोणतेही बदल सुचवणार नाही कारण ते सर्व नियमांनुसार आहेत. परंतु मी हे बऱ्याच काळापासून सांगत आहे की, प्रत्येक मैदानावर चौकाराचा आकार वाढवा. आज या मैदानाकडे बघा, दोन मीटरने आणखी थोडे मागे नेण्यासाठी पुरेशी जागा आहे. हा झेल आणि षटकार यातील फरक अनेकदा मोठा फरक पाडू शकतो. तुम्ही त्या LED किंवा जाहिरात फलकांना आणखी ढकलू शकता जेणेकरून सीमा दोरी 2-3 मीटर मागे जाऊ शकेल आणि त्यामुळे फरक पडेल. अन्यथा, गोलंदाजांनाच त्रास होईल,” असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.

संतापलेल्या सुनील गावसकर यांनी T20 क्रिकेटमधील पॉवर हिटिंग पाहणं रोमांचक असलं तरी ते शेवटी कंटाळवाणे होते. कारण फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये स्पर्धाच पाहायला मिळत नाही असंही म्हटलं. “गेल्या काही दिवसांपासून आपण टी-20 क्रिकेटमध्ये जे पाहत आहोत ते म्हणजे प्रशिक्षक नेटवर सांगतो तशी ही फलंदाजी आहे, 'ही शेवटची फेरी आहे' आणि प्रत्येकजण आऊट होण्याची चिंता न करता बॅट फिरवू लागतो. हे थोड्या प्रमाणात आनंददायक आहे, परंतु त्यानंतर ते रोमांचक राहत नाही. मला एक कठोर शब्द वापरायचा होता, पण नाही,” असं ते म्हणाले.