IPL 2024: आतापर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून चाहत्यांना प्रत्येक हंगामात अपेक्षा असतात. पण या हंगामातही चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. 8 सामन्यांपैकी 7 सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आहे. रविवारी कोलकाताना नाईट रायडर्सने एका धावेने बंगळुरुचा पराभव केला. यासह बंगळुरु संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. बंगळुरुच्या नावे 8 सामन्यानंतर फक्त 2 गुण आहेत. त्याने नेट रन रेट -1.046 आहेत. खराब कामगिरीमुळे बंगळुरु संघाचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न आता अडथळ्यांनी भरलेलं आहे, पण अशक्य नाही. पण आता संघाचं भविष्य पूर्णपणे त्यांच्या हातात नाही.
बंगळुरु संघाचे या हंगामातील 6 सामने शिल्लक आहेत. सहाही सामने जिंकल्यास त्यांची गुणसंख्या 14 होईल. सामान्यपणे एखाद्या संघाला प्लेऑफ स्टेजला पोहोचायचं असेल तर 16 गुणांची गरज असते. पण एखादा संघ 14 गुणांसहही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. पण यासाठी इतर सामन्यांचे निकाल त्यांच्यासाठी अनुकूल असणारे हवेत.
त्यामुळे आता बंगळुरु संघासमोर एकच मार्ग आहे. ते म्हणजे सर्वच्या सर्व 6 सामने जिंका आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहा. जर इतर सामन्यांच्या निकालाने अटीतटीची स्थिती निर्माण झाली तर बंगळुरु संघ 14 गुणांसह टॉप 4 संघात दाखल होऊ शकतो.
दरम्यान रविवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास कोलकाताने बंगळुरुसमोर 222 धावांचा डोंगर उभा केला होता. बंगळुरु संघाने आव्हानाचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. पण अखेरच्या क्षणी एका धावेमुळे त्यांनी सामना गमावला. या सामन्यात विराटच्या विकेटवरुन अम्पायरशी वाद घालण्यात आला होता.
बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सामन्यानंतर यावर बोलताना म्हटलं की, "हे फारच अनाकलनीय आहे. नियम हे नियम असतात. मला आणि विराटला चेंडू कमरेच्या वर असल्याचं वाटत होतं. एका संघाला तो जास्त वर असल्याचं वाटतं आणि दुसऱ्याला नाही. खेळात अशाच गोष्टी होत असतात".
"सुनील नरीनने टाकलेली ओव्हर सामन्याचं चित्र बदलणारी ठरली. छोट्या गोष्टींनी फार फरक पडतो. पण मला खेळाडूंचा अभिमान वाटत आहे. आज त्यांनी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यात चांगली कामगिरी केली. आम्ही अखेरीस काही जास्त धावा दिल्या. पण आम्ही त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. आम्ही पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करण्याचं ठरवलं होतं," असं त्याने सांगितलं.
"आम्ही हताश होतो. पण आम्ही पूर्ण प्रयत्न केले. आमच्याकडे अविश्वसनीय चाहतावर्ग आहे, आम्हाला त्यांना आनंदी करायचं आहे, आम्हाला ते हवे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आहे," अशी भावना त्याने व्यक्त केली.