KKR vs RCB : 6,6,6... 24 कोटीच्या बॉलरला शेवटच्या ओव्हरमध्ये फुटला घाम, RCB च्या स्पिनरने केली धुलाई

KKR vs RCB: आयपीएल 2024 च्या लिलावात जेव्हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे नाव समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनेक फ्रँचायझी त्याला त्यांच्या टिममध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक होत्या. पण शेवटी KKR ने त्याच्यावर 24.5 कोटी रुपये खर्च केले. पण ईडन गार्डन्सवर आरसीबीच्या गोलंदाजामुळे स्टार्कला चक्क घाम फुटला.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 22, 2024, 08:48 AM IST
KKR vs RCB : 6,6,6... 24 कोटीच्या बॉलरला शेवटच्या ओव्हरमध्ये फुटला घाम, RCB च्या स्पिनरने केली धुलाई  title=

आयपीएल 2024 च्या लिलावात जेव्हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे नाव समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनेक फ्रँचायझी त्याला त्यांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यास उत्सुक होत्या. पण शेवटी KKR ने त्याच्यावर 24.5 कोटी रुपये खर्च करुन संघात घेतले. पण आयपीएल 2024 मध्ये 24 कोटी रुपये खर्च करुन खरेदी केलेल्या खेळाडूचं चक्क मांजर होताना पाहायला मिळालं. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे KKR आणि RCB यांच्यातील सामना, ज्यात शेवटच्या षटकात 21 धावांचा बचाव करताना स्टार्कला घाम फुटला.

शेवटच्या षटकाचा थरार?

प्रथम फलंदाजी करताना केकेआरने आरसीबीसमोर 223 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी 21 धावांची गरज होती. आरसीबी संघाने 8 विकेट गमावल्या होत्या आणि चेंडू मिचेल स्टार्कच्या हातात होता. आरसीबीचा फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा क्रिजवर उपस्थित होता आणि त्याने स्टार्कला अशा प्रकारे रिमांडवर घेतले की, ईडन गार्डन्स स्टेडियम जल्लोषाने गुंजले. कर्ण शर्माने पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला. दुसरा चेंडू डॉट होता. यानंतर कर्ण शर्माने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लागोपाठ दोन षटकार मारून केकेआरचा श्वासच रोखला. 

कर्ण शर्माच्या विकेटने निघाला दम

आरसीबीला 2 चेंडूत फक्त 3 धावा हव्या होत्या. पण कर्ण शर्माने सरळ शॉट खेळला आणि स्टार्कने एका हाताने झटपट अप्रतिम झेल घेतला. यानंतर आरसीबीच्या लॉकी फर्ग्युसनने शेवटच्या चेंडूवर शॉट खेळला पण त्याला फक्त दोन धावा मिळाल्या. केकेआरने सामना जिंकला असला तरी शेवटच्या षटकात 21 धावांचा बचाव करण्यासाठी स्टार्कला अक्षरशः घाम गाळावा लागला. 

मिचेल स्टार्क ठरला फ्लॉप

आयपीएल 2024 मध्ये मिचेल स्टार्क फ्लॉप ठरला. त्याने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत पण फक्त 6 विकेट घेतल्या आहेत. इतकंच नाही तर स्टार्कही चांगलाच महागात पडला आहे. आता KKR कर्णधार श्रेयस अय्यर त्याला आगामी सामन्यांमध्ये सतत संधी देतो की, नाही हे पाहायचे आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या स्टार्कवर टी-20 विश्वचषकापूर्वी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.