Auto News : यंदाच्या वर्षी भारतात बऱ्याच कार उत्पादक कंपन्या त्यांचे नवे कार मॉडेल सादर करणार आहेत. किंबहुना याची सुरुवातही झाली असून, या उत्साही वातावरणात विंडसर इलेक्ट्रीक कारला मिळालेल्या यशानंतर आता मोरिस गॅरेजेस म्हणजेच एमजी मोटर्स (MG Motors) कडून एक अफलातून मॉडेल सादर करण्याची तयारी केली जात आहे. हल्लीच या कंपनीकडून देशातील पहिली इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कार एमजी सायबरस्टर लाँच करम्याची घोषणा केल्यानंतर MG M9 सादर करण्याची तयारी केली जात आहे.
17 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ही कार सादर केली जाणार आहे. याचवेळी कारची किंमत आणि फिचर्सही जाहीर केले जाण्याची अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे. नुकतंच या कंपनीनं अल्ट्रा लक्झरी अशा या आलिशान कारची एक झलक सर्वांसमोर आणली आहे. ही कार प्रेसिडेन्शिअल लिमोजिन असल्याचा दावा कंपनी करत असून, या कारमध्ये असणारे अत्याधुनिक फिचर्स कमाल ताकदीचे आणि प्रभावशाली असतील असाही दावा केला जात आहे.
5270 मिमी लांबी आणि 2000 मिमी रुंदी असणारी ही कार 7 व्यक्तींची आसनक्षमतेसह प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणारी ठरेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. कारचा लूकसुद्धा पहिल्याच नजरेत प्रभाव पाडणारा असून, आता त्यासाठीची किंमत नेमकी किती असेल याचीच उत्सुकता कारप्रेमींच्या मनात घर करत आहे.
लूकविषयी म्हणावं तर, एमजी एम9 कारला MPV सारखा बॉक्सी लूक देण्यात आला असून, त्यात अनेक डिझाईन एलिमेंट्स जोडण्यात आले आहेत. कारच्या बोनेटपाशी एलईडी लाईट बार देण्यात आला असून, त्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टक्न सिग्नल देण्यात आले आहेत. कारच्या बम्परवर हेडलँप असून, त्यावर क्रोम आऊटलाईन आहे.
बम्परच्या खालच्या बाजूला फॉक्स एअर डॅममध्ये लायसन्स प्लेट आणि सेन्सरही देण्यात आला आहे. तर, मागच्या बाजूस क्रोम बीट्स आणि टेल लाईट देण्यात आले आहेत. अद्यापही या कारच्या भारतात सादर केल्या जाणाऱ्या मॉडेलसंदर्भातील सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण, जागतिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या कारच्या मॉडेलमध्ये कंपनीनं 90kWh क्षमतेचं लिथियम ऑयन बॅटरी प्रक दिलं असून, ते सिंगल चार्जमध्ये 430 ते 565 किमी इतकी रेंज देतं.
कारच्या इंटेरिअरविषयी सांगावं तर त्यामध्ये आलिशान अशा केबिन सीट देण्यात आल्या आहेत. कारच्या दुसऱ्या रांगेत कंपनीकडून रिकलायनिंग ऑटमन सीट देण्यात आल्या असून, त्या विविध प्रकारच्या 8 पद्धतीच्या मसाज फंक्शननी परिपूर्ण आहेत. लांबच्या प्रवासासाठी हे फिचर मदतीचं ठरणार आहे. कारला थ्री झोन क्लायमेट कंट्रोलचा पर्याय उपलब्ध असून, टचस्क्रीन पॅनल, सीट वेंटिलेशन, ड्युअल सनरूफ, पॉवर्ड स्लायडिंग, मागील सीटसाठीसुद्धा एन्टरटेन्मेंट सीट असे फिचर या कारमध्ये देण्यात आले आहेत. प्रिमयम कार असल्या कारणानं देशात लाँच होताच ही कार सुरुवातीला फक्त 12 शहरांमध्येच विक्रीसाठी उपलब्ध असेल असंही सांगण्यात येत आहे.