IPL 2024, RCB vs CSK: चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK) पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने (RCB) प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. चेन्नई आणि बंगळुरु या दोन्ही संघांसाठी हा करो या मरो सामना असल्याने दोन्ही संघाच्या चाहते उत्सुक होते. पण अखेर बंगळुरुने आपला विजयरथ कायम ठेवत चेन्नईलाही धूळ चारली. दरम्यान या विजयानंतर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) मारलेल्या षटकारामुळे आपण जिंकलो असं म्हणताच ड्रेसिंग रुममध्ये एकच हशा पिकला.
सामन्यानंतर संघाशी संवाद साधताना दिनेश कार्तिकने आपली विनोदी बाजू दाखवली. महेंद्रसिंग धोनीने 110 मीटर दूर षटकार मारल्याने बंगळुरु संघ चेन्नईचा पराभव करु शकला असं दिनेश कार्तिकने यावेळी म्हटलं. बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण चेन्नईला प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी फक्त 201 धावा करण्याची गरज होती. पण चेन्नईचा 27 धावांनी पराभव करुन बंगळुरु संघ दिमाखात प्लेऑफमध्ये पोहोचला.
चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज असताना धोनीने यश दयालच्या गोलंदाजीवर मोठा षटकार लगावला. 110 मीटर दूर मारलेला हा षटकार थेट मैदानाच्या बाहेर गेला होता. यानंतर यश दयालने पुढचाच चेंडू धीमा टाकला आणि धोनीला झेलबाद करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
Eloquent, Cheeky and Funny: DK’s Dressing Room Masterclass
“We have within our grasp, to do something, where people will remember us for many many decades. They’ll say wow, that RCB team was special.” #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvCSK pic.twitter.com/nmcuz1JeQB
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 19, 2024
या विकेटनंतर यश दयालला सूर गवसला आणि त्याने एकही धाव दिली नाही. यानंतर चेन्नईने 27 धावांनी हा सामना गमावला आणि स्पर्धेतून बाहेर पडले. दिनेश कार्तिकने त्याच्या गोलंदाजीवर म्हटलं की, धोनीने मैदानाबाहेर चेंडू मारल्याने नवा चेंडू मिळाला आणि यश दयालला फायदा झाला. "आज सर्वात चांगली गोष्ट अशी झाली की, धोनीने मैदानाबाहेर चेंडू टोलवला आणि आपल्याला नवा चेंडू मिळाला. ज्याच्याने गोलंदाजी करणं आणखी चांगलं होतं," असं दिनेश कार्तिक म्हणाला.
"हो त्याने चांगली गोलंदाजी केली. जेव्हा तुमच्या मनात शंका असते तेव्हा लेग स्टम्पवर फूट टॉस टाकावा. जेव्हा चेंडू ओला असतो तेव्हा हाच योग्य मंत्रा असतो," असंही दिनेश कार्तिकने सांगितलं.
दिनेश कार्तिकने यावेळी संघाचं कौतुक केलं. बंगळुरु संघ मालिकेत एका क्षणी सलग 6 सामने गमावत गुणतालिकेत खाली होता, पण नंतर सलग 6 सामने जिंकत सगळं चित्र बदललं. "आपण ज्याप्रकारे हा प्रवास केला आहे, त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. लोकांना नेहमीच काही प्रवास लक्षात राहतात. 8 सामन्यानंतर पुनरागमन करत सलग 6 सामने जिंकण्याचा हा आपला प्रवास फार काळ लोकांच्या लक्षात राहील," असं दिनेश कार्तिकने म्हटलं.
बंगळुर संघ आता 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे.