IPL 2023: "तू अजून म्हातारा..." असं सांगताच धोनीने दिलं उत्तर; म्हणाला "फक्त जर तुम्ही सचिन तेंडुलकर..."

IPL 2023: आयपीएलच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत आहे. धोनीचं नेतृत्व आणि फिटनेस याचं चाहत्यांकडून कौतुक होत असताना धोनीने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा उल्लेख करत आपलं म्हणणं मांडलं.   

शिवराज यादव | Updated: Apr 23, 2023, 12:08 PM IST
IPL 2023: "तू अजून म्हातारा..." असं सांगताच धोनीने दिलं उत्तर; म्हणाला "फक्त जर तुम्ही सचिन तेंडुलकर..." title=

IPL 2023: आयपीएलच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत असून त्यांचं नेतृत्वकौशल्य आणि फिटनेस यांचं कौतुक होत आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाविरोधात झालेल्या सामन्यात धोनीने स्टम्पच्या मागे जबरदस्त झेल घेतला. तसंच स्टम्पिंग आणि रन-आऊट घेत हैदराबाद संघाला 20 षटकांत 134 धावांवर रोखलं. या सामन्यात चेन्नईने (Chennai Superkings) हैदराबादचा सहज पराभव केला. दरम्यान सामन्यानंतर धोनीने घेतलेल्या झेलाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र 'कॅच ऑफ द मॅच'चा पुरस्कार ऋतुराज गायकवाडला देण्यात आला. सामन्यानंतर धोनीने झेल घेण्यासाठी सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने केलेल्या प्रयत्नाचा किस्सा सांगितला. 

सामन्यानंतर बोलताना धोनीने सांगितलं की, "अनुभव मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि तो तेव्हाच येऊ शकतो जेव्हा तुमचं वय होतं. यामध्ये सचिन तेंडुलकर अपवाद आहे".

"मी चुकीच्या ठिकाणी होते. आम्ही ग्लोव्ह्ज घालतो, म्हणून लोकांना हे सोपं आहे असं वाटतं. मला वाटतं हा फार उत्तम झेल होता. यामागे क्षमता नाही तर कधी कधी तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी उभे असता," असं धोनीने सांगितलं. 

"मला आठवतं एकदा राहुल द्रविड यष्टीरक्षण करत असताना असाच झेल घेतला होता. तुमच्याकडे कौशल्य नसेल तर असा झेल घेता येत नाही. असा झेल घेण्यासाठी तुम्ही फार चुकीच्या ठिकाणी असलं पाहिजे. याशिवाय तुमचं वय झालं की तुम्ही जास्त अनुभवी होता. यामध्ये वयाच्या 16-17 व्या वर्षी खेळण्यास सुरुवात करणारा सचिन तेंडुलकर अपवाद आहे," असं धोनीने म्हटलं. 

यावेळी समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला तुझं अजून वय झालेलं नाही असं म्हटलं असता त्यानेही स्पष्ट उत्तर दिलं. "नक्कीच वय झालं आहे. यामध्ये लाजण्याचं कारण नाही," असं धोनी म्हणाला.