IPL 2020 : आयपीएलवर कोरोनाचं संकट? सौरव गांगुली म्हणतो...

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयदेखील चिंतित आहे. 

Updated: Mar 6, 2020, 08:47 PM IST
IPL 2020 : आयपीएलवर कोरोनाचं संकट? सौरव गांगुली म्हणतो... title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयदेखील चिंतित आहे. कोरोनामुळे आयपीएल होणार का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. पण कोरोना व्हायरसचा आयपीएलच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नाही, असं आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं आहे. बीसीसीआयचे अधिकारी या मुद्द्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. आयपीएलची तयारी सुरु आहे आणि बोर्ड याचं यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं गांगुलीने सांगितलं. आयपीएलच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना व्हायरसचे ३१ रुग्ण सापडले आहेत.

बीसीसीआय केंद्र सरकारच्या शिफारसींवर काही मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्याचा विचार करत आङेत. ही मार्गदर्शक तत्त्व खेळाडू, विमान कंपन्या, टीमची हॉटेल, प्रसारण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि आयपीएलचं आयोजन करणाऱ्यांना देण्यात येतील. बीसीसीआय आयपीएलच्या खेळाडूंना क्रिकेट चाहत्यांशी हस्तांदोलन करण्याचीही परवानगी न देण्याची शक्यता आहे. तसंच खेळाडूंना चाहत्यांसोबत मोबाईलवर फोटो काढण्यावरही निर्बंध येऊ शकतात.

कोरोना व्हायरसमुळे टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या आयोजनावरही संकट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. पण जपानमध्येही कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

आयपीएलमध्ये पहिला सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे. २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. चेन्नईची टीम ३ वेळा तर मुंबईची टीम सर्वाधिक ४ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.