IPL 2020 : आयपीएलच्या बक्षिसाच्या रकमेचा वाद वाढला, टीम मालकांनी घेतला हा निर्णय

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

Updated: Mar 6, 2020, 07:54 PM IST
IPL 2020 : आयपीएलच्या बक्षिसाच्या रकमेचा वाद वाढला, टीम मालकांनी घेतला हा निर्णय title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच बक्षिसाच्या रकमेचा वाद वाढला आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या बक्षिसाची रक्कम अर्धी करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल टीमच्या मालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

बीसीसीआयच्या निर्देशानुसार आयपीएल जिंकणाऱ्या टीमला आता २० कोटींऐवजी १० कोटी रुपये मिळणार आहेत. तसंच उपविजेत्या टीमला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी रुपये मिळतील. दोन्ही क्वालिफायर टीमना प्रत्येकी ४.३७ कोटी रुपयांचं बक्षिस मिळेल.

बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आयपीएलच्या सगळ्या ८ टीमची दोन दिवस बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरा दिल्लीने या चर्चेला सुरुवात केली. सगळ्या टीमनी बराच काळ चर्चा केल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. या पत्रावर सगळ्या टीमच्या मालकांची सही असणार आहे.

आयपीएल टीमना बक्षिसाची रक्कम कमी केल्याची माहिती दिली नसल्यामुळे नाराजी आहे. मीडियाच्या माध्यमातूनच टीमना याची माहिती मिळाली. अशाचप्रकारे आयपीएल ऑल स्टार मॅचची योजना बनवण्यात आली होती. त्याची माहितीही टीमना शेवटी मिळाली, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

बीसीसीआयने मंदीचं कारण देत आयपीएलच्या बक्षिसाची रक्कम अर्धी करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल टीम बोर्डाच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतही हा मुद्दा येण्याची शक्यता आहे.