आयपीएल २०२० साठी १९ डिसेंबरला लिलाव

२०२० साली होणाऱ्या आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावाचा मुहूर्त ठरला आहे.

Updated: Oct 1, 2019, 04:38 PM IST
आयपीएल २०२० साठी १९ डिसेंबरला लिलाव title=

मुंबई : २०२० साली होणाऱ्या आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावाचा मुहूर्त ठरला आहे. यावर्षी १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. याआधी आयपीएलचा लिलाव बंगळुरूमध्ये व्हायचा, यावेळी मात्र ठिकाण बदलण्यात आलं आहे. पण यावर्षीचा लिलाव फार मोठा असणार नाही. २०२१ साली मात्र टीमना मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना सोडावं लागणार आहे, त्यामुळे २०२१ साठीचा लिलाव मोठा असेल. याआधी २०१८ साली खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडला होता. त्यावेळी प्रत्येक टीमला ५ खेळाडू कायम ठेवून उरलेले खेळाडू लिलावात उतरवावे लागले होते.

सगळ्या ८ टीमसाठी १४ नोव्हेंबरला ट्रेडिंग विंडो बंद होणार आहे. म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंत टीम खेळाडूंची अदलाबदली करू शकतात. २०२०साठीच्या लिलावात टीमना एकूण ८५ कोटी रुपये वापरता येणार आहेत. प्रत्येक टीमला त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा ३ कोटी रुपये जास्त वापरता येऊ शकतात.

सध्या दिल्लीच्या टीमकडे सर्वाधिक ८.२ कोटी रुपये शिल्लक आहेत. तर राजस्थानकडे ७.१५ कोटी रुपये, कोलकात्याकडे ६.०५ कोटी रुपये, हैदराबादकडे ५.३ कोटी रुपये, पंजाबकडे ३.७ कोटी रुपये, चेन्नईकडे ३.२ कोटी रुपये, मुंबईकडे ३.०५ कोटी रुपये आणि बंगळुरूकडे १.८ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे.

मागच्यावर्षी रोहित शर्माच्या मुंबईने फायनलमध्ये धोनीच्या चेन्नईचा पराभव केला होता. सर्वाधिक म्हणजेच ४ वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई ही एकमेव टीम आहे. तर चेन्नईने २०१८ साली शेवटची आयपीएल जिंकली होती. चेन्नईने ३ वेळा आयपीएलवर आपलं नाव कोरलं आहे.