माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ७ विकेटनं दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-०नं खिशात टाकली आहे. या मालिकेतल्या आणखी २ मॅच अजून बाकी आहेत. २४४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं सर्वाधिक ६२ धावा तर कर्णधार विराट कोहलीनं ६० धावांची खेळी केली. अंबाती रायुडूनं नाबाद ४० धावा आणि दिनेश कार्तिकनं नाबाद ३८ धावा केल्या. रायूडू आणि कार्तिक यांच्यामध्ये नाबाद ७७ धावांची भागीदारी झाली. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा शिखर धवन २८ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडकडून बोल्टला २ तर सॅण्टनरला १ विकेट मिळाली.
या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. भारतानं या मॅचमध्ये धोनीऐवजी कार्तिकला आणि विजय शंकरऐवजी हार्दिक पांड्याला संधी दिली होती. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडला भारतीय बॉलरनी सुरुवातीपासून धक्के दिले. पण रॉस टेलर आणि टॉम लेथम यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. रॉस टेलरनं ९३ धावांची आणि टॉम लेथमनं ५१ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.
कॉफी विथ करण शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हार्दिक पांड्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर पुनरागमन करणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये चमकदार कामगिरी केली. पण त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.
न्यूझीलंड दौऱ्यातला कर्णधार विराट कोहलीचा हा शेवटचा सामना आहे. यापुढच्या २ मॅच आणि ३ टी-२० मॅचच्या मालिकेसाठी रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. वारंवार क्रिकेट खेळत असलेल्या विराटला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघ प्रशासनानं घेतला आहे.