सदोष ऍक्शनमुळे अंबाती रायुडूच्या बॉलिंगवर बंदी

सदोष ऍक्शनमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या बॉलिंगवर बंदी

Updated: Jan 28, 2019, 02:39 PM IST
सदोष ऍक्शनमुळे अंबाती रायुडूच्या बॉलिंगवर बंदी title=

दुबई : भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडू याला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉलिंग करता येणार नाही. सदोष बॉलिंग ऍक्शनमुळे आयसीसीनं अंबाती रायुडूच्या बॉलिंगवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये अंबाती रायुडूनं २ ओव्हर बॉलिंग केली होती. या २ ओव्हरमध्ये रायुडूनं १३ धावा दिल्या होत्या. या मॅचदरम्यान रायुडूनं केलेल्या बॉलिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसंच आयसीसीनं रायुडूच्या बॉलिंग ऍक्शनबद्दलचा रिपोर्ट भारतीय टीम प्रशासनालाही दिला होता.

१४ दिवसांमध्ये रायुडूला त्याच्या बॉलिंगची चाचणी द्यावी लागणार होती. पण रायुडूनं ही चाचणी दिली नसल्यामुळे आयसीसीनं त्याच्या बॉलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या नियम ४.२ नुसार रायुडूवर ही कारवाई करण्यात आली.

रायडूने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत ४६ मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने केवळ २०.१ इतक्याच ओव्हर टाकून ३ विकेट मिळवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे शमीच्या वाटच्या २ ओव्हर रायुडूनं टाकल्या होत्या.

वादग्रस्त बॉलर

क्रिकेमध्ये बॉलर्सच्या बॉलिंग ऍक्शनवरुन वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अशा अनेक बॉ़लर्सच्या ऍक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. यात पाकिस्तानचा स्पिनर मोहम्मद हाफीज, सईद अजमल वेस्ट इंडिजचा सुनील नारायण, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताच्या हरभजन सिंगच्या बॉलिंग ऍक्शनवरून वाद निर्माण झाले होते.