INDvsENG WOMEN : भारतीय महिला टीमसाठी आज करो किंवा मरो

भारतीय महिला टीमल सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आज विजय मिळवावा लागेल.

Updated: Mar 7, 2019, 11:11 AM IST
INDvsENG WOMEN : भारतीय महिला टीमसाठी आज करो किंवा मरो title=

गुवाहाटी : इंग्लड विरुद्ध दुसऱ्या टी-२० मॅचला  सुरुवात झाली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतीय महिला टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरली आहे. इंग्लंड विरुद्धची दुसरी टी-२० मॅच या सीरिजच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडकडे १-० अशी आघाडी आहे. तसेच या ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये आजची मॅच जर इंग्लंडने जिकंली तर भारतावर सीरिज गमावण्याची नामुष्की ओढावेल. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीत आज विजय मिळवावा लागेल. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारतीय महिला टीमला ४१ रन्सने पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारताची ३ मॅचच्या सीरिजमध्ये ०-१ अशी पिछेहाट झाली. ही टी-२० सीरिज पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.

भारतीय महिला टीमचा टी-२० मध्ये आतापर्यंत ४ मॅचमध्ये सलग पराभव झाला आहे. जर आजच्या मॅचमध्ये पराभव झाला तर भारतीय महिला टीमचा हा सलग पाचवा पराभव असेल. त्यामुळे ही मॅच जिंकून पराभवाच्या मालिकेला ब्रेक लगावण्याचा प्रयत्न भारतीय टीमचा असेल. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये  भारतीय महिला टीमने ३ मॅचची सीरिज ०-३ अशा एकतर्फी फरकाने गमावली होती. 

इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मध्ये इंग्लंडने भारताला विजयासाठी १६१ रन्सचे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचे पाठलाग करताना भारतीय महिला टीमला केवळ ११९ रन करता आल्या. हरलीन देओल, हंगामी कॅप्टन स्मृती मंधाना आणि  जेमिमा रॉड्रीग्ज यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा कोणालाच पूर्ण करता आली नाही. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या हरमीनप्रीत कौरची टीममध्ये कमतरता जाणवत आहे.

गेल्या अनेक सीरिजपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेली महाराष्ट्राची लेक स्मृती मंधाना पहिल्या टी-२० मध्ये विशेष काही करता आले नाही. हरमीनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत मिताली राज कडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. परंतू मिताली अवघ्या ७ रन करुन तंबूत परतली. इंग्लंड विरुद्धच्या या सीरिजमध्ये टीममध्ये पुनरागमन केलेल्या वेदा कृष्णामृती पहिल्या टी-२० मॅचमध्ये अयशस्वी ठरली. तिने अवघ्या १५ रन केल्या. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या आणि मधल्या फळीतील बॅट्समननी निराशा केली. त्यामुळे आजच्या दुसऱ्या टी-२० मध्ये या सर्वांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

भारतीय  महिला  टीम : स्मृति मंधाना (कॅप्टन), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (विकेटकीपर), भारती फुलमाली, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झांझड, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हर्लिन देओल.

इंग्लंड महिला टीम: हीदर नाइट (कॅप्टन), टॅमी ब्युमाँट , कॅथरिन ब्रंट,केट क्रॉस, सोफिया ब्राऊन, फ्रेया डेव्हिस, जॉर्जिया एल्व्हिस, एमी जोन्स,लॉरा मार्श, नताली शिव्हर, अन्या श्रुबसोल, लिन्से स्मिथ, लॉरेन विनफिल्ड, डैनियली वाट आणि अ‍ॅलेक्स हार्टले.