...तर भारतात वर्ल्ड कप घेऊ नका, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा

२०२१ सालच्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे.

Updated: Mar 6, 2019, 09:06 PM IST
...तर भारतात वर्ल्ड कप घेऊ नका, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा title=

मुंबई : २०२१ सालच्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे. पण बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामधला वर्ल्ड कप आयोजनाच्या कराबाबतचा वाद वाढत चालला आहे. २०२१ आणि २०२३ च्या वर्ल्ड कपचं नियोजन करायचं असेल, तर करामध्ये सूट द्यावी लागेल, असं आयसीसीनं बैठकीमध्ये बीसीसीआयला सांगितलं. जर बीसीसीआयनं असं केलं नाही तर भारताला वर्ल्ड कपचं आयोजन गमवावं लागू शकतं. आयसीसीच्या या इशाऱ्याला बीसीसीआयनं केराची टोपली दाखवली आहे. आयसीसीला पाहिजे असेल तर त्यांनी वर्ल्ड कप दुसरीकडे हलवावा, असा उलट इशाराच बीसीसीआयनं दिला आहे.

बीसीसीआयचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला 'आयसीसी भारतातल्या वर्ल्ड कपचं आयोजन काढून घेऊ शकतं. मग बीसीसीआयपण आपला महसूल आयसीसीकडून परत घेईल. मग कोणाचं नुकसान होईल ते बघू. आयसीसीचे असे निर्णय मानणं कठीण आहे.'

'सगळ्या संघटनांना एकत्र घेऊन चालण्याच्या गोष्टी आयसीसी करते, पण त्यांचा प्रयत्न हा प्रत्येकवेळी भारताला नुकसान पोहोचवण्याचा असतो. आधीही असं झालं होतं. आयसीसी त्यांच्या सदस्यांची वेगळ्या पद्धतीनं वागते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फक्त करामध्ये सूट मिळवण्याचा प्रयत्न करायला सांगितलं जातं. तर भारताला करात सूट मिळणं निश्चित करा, असं सांगितलं जातं', अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली.