रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होतो का? भारतीय संघाच्या प्रशिक्षकानं खरं काय ते सांगितलं

बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी भारतीय खेळाडूंचा फिटनेस तसंच यो-यो फिटनेस चाचणीचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 11, 2023, 02:10 PM IST
रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होतो का? भारतीय संघाच्या प्रशिक्षकानं खरं काय ते सांगितलं title=

भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच उत्तर देईल. त्यातच यो-यो फिटनेस चाचणीमुळे खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा नेहमीच फिटनेसवरुन होणाऱ्या चर्चांच्या केंद्रस्थानी असतो. बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी नुकतंच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माच्या फिटनेससंबंधी खुलासा केला आहे. 

"रोहित शर्मा फिट खेळाडू आहे. त्याचा फिटनेस चांगला आहे. तो थोडा जाड दिसतो, पण नेहमीच यो-यो चाचणीत उत्तीर्ण होतो. तो विराट कोहलीइतकाच फिट आहे. तो दिसताना जाड वाटतो, पण आपण त्याला मैदानात पाहिलं आहे. त्याची चपळता आणि गतिशीलता अप्रतिम आहे. तो फिट क्रिकेटर्सपैकी आहे," असं अंकित कलियार यांनी स्पष्ट केलं आहे. 

सध्याच्या भारतीय संघात शारिरीकदृष्ट्या सर्वात फिट क्रिकेटर कोण आहे? असं विचारण्यात आलं असता, त्यांनी विराट कोहली उत्तर दिलं. विराट कोहली खेळत असला किंवा नसला तरी आपलं वेळापत्रक पाळतो. तो नेहमीच पोषण, प्रशिक्षण आणि कंडिशनिंग या सगळ्यांची काळजी घेत असतो. तो कधीच आपलं वेळापत्रक मोडत नाही. तो फक्त भारत नाही तर जगातील सर्व फिट खेळाडू आहे असं ते म्हणाले आहेत. 

अंकित कलियार यांनी विराट कोहलीचं कौतुक करताना त्याने संघात फिटनेसची परंपरा आणल्याचं म्हटलं आहे. त्याने सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं असून, कर्णधार असताना सर्वजण फिट राहतील याची काळजी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्याने संघात शिस्त आणल्याचं कौतुक त्यांनी केलं. 

यो-यो चाचणीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, जेव्हा एखादा फलंदाज चेंडू टोलावतो तेव्हा खेळाडू किती वेळात त्या चेंडूच्या मागे धावून अडवत पुन्हा मागे सोपवतो. किंवा चेंडू टोलवल्यानंतर फलंदाज किती धावा पळून काढतो या गोष्टी महत्त्वाच्या असता. या चाचणीत काही पॅरामीटर्स आहेत. 17 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळणारे यात उत्तीर्ण होतात. त्यामुळे या चाचणीत खेळाडू संघाचा भाग होण्यासाठी फिट आहे की, नाही याचा निर्णय घेतला जातो. 

दरम्यान यावेळी त्यांनी शुभमन गिलने विराट कोहलीचा आदर्श ठेवला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "शुभमन फार फिट आहे. तो फक्त फिट नाही तर कौशल्यवान खेळाडू आहे. शुभमन विराकडून प्रेरित झाला आहे, यात काही वाद नाही. मग ती फलंदाजी, फिटनेस किंवा कौशल्य असो. शुभमन सर्व बाबतीत विराटला फॉलो करत आहे. शुभमन आगामी काळात देशासाठी मोठी कामगिरी करेल याची मला खात्री आहे".