'म्हणून पुन्हा सुपर ओव्हर टाकली', टीम साऊदीचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे.

Updated: Jan 31, 2020, 11:21 PM IST
'म्हणून पुन्हा सुपर ओव्हर टाकली', टीम साऊदीचं स्पष्टीकरण title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे. याआधी तिसऱ्या टी-२० मॅचचा निकालही सुपर ओव्हरमध्ये लागला होता, आणि त्या मॅचमध्येही भारताने विजय खेचून आणला होता. या दोन्ही मॅचमध्ये टीम साऊदीनेच सुपर ओव्हर टाकली. चौथ्या टी-२० मॅचमध्ये केन विलियमसनऐवजी टीम साऊदीने न्यूझीलंडचं नेतृत्व केलं. न्यूझीलंडने भारतीय टीमला संधी दिली आणि या संधीचं भारताने सोनं केलं, अशी प्रतिक्रिया कर्णधार टीम साऊदीने दिली.

या मॅचमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १६५ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडलाही २० ओव्हरमध्ये १६५ रनच करता आले. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी ७ रनची गरज होती. शेवटच्या ओव्हरमध्ये अर्धशतक केलेला टीम सायफर्ट आणि अनुभवी रॉस टेलर मैदानात होते. तरीही न्यूझीलंडला ही मॅच जिंकता आली नाही.

'अशा परिस्थितीमध्ये सामना गमावणं वेदनादायी आहे. या स्थितीमध्ये आमचा विजय झाला असता. आम्ही भारताला संधी दिली, आणि त्यांनी याचा फायदा उचलला,' असं साऊदी म्हणाला.

सुपर ओव्हरमध्ये पुन्हा बॉलिंग का घेतली, असा प्रश्न साऊदीला विचारण्यात आला, तेव्हा 'आमचं बॉलिंग आक्रमण युवा आहे. जेव्हा तुम्ही जिंकत नाही आणि समोर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅट्समन असतात, तेव्हा गोष्टी कठीण असतात. भारतासारख्या टीमला तुम्ही थोडीजरी संधी दिली, तरी तुमच्यासाठी गोष्टी कठीण होतात,' असं वक्तव्य साऊदीने केलं. 

'साऊदी, न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर'चा नकोसा विक्रम