मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या T-20 सामन्यात नवा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाच्या अशा महान खेळाडूला बाहेर ठेवलं, ज्याने भारतासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल याला रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही.
कालच्या सामन्यात युझवेंद्र चहलला संधी न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटतंय. या सामन्यात रोहित शर्माने युझवेंद्र चहलऐवजी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडलं.
अक्षर पटेलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 ओव्हरमध्ये गोलंदाजीत एकही विकेट न घेता 31 धावा दिल्या. युझवेंद्र चहलला संधी दिली असती तर न्यूझीलंडचा संघ 150 धावांपर्यंत पोहोचू शकला नसता असं अनेकांचं मत आहे. अक्षर पटेलला केवळ त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावर संधी देण्यात आली, हा निर्णय चुकीचा ठरला.
एका वेबसाईटशी बोलताना युझवेंद्र चहल म्हणाला, "गेल्या चार वर्षात मला टीम इंडियातून वगळलं नाही आणि त्यानंतर इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी मला अचानक संघातून वगळण्यात आलं. मला खूप वाईट वाटलं. मी दोन तीन दिवस डाऊन होतो. पण, त्यानंतर मला माहित होतं की आयपीएलचा दुसरा टप्पा आता जवळ येणार आहे."
"मी माझ्या कोचकडे गेलो आणि त्यांच्याशी खूप बोललो. माझी पत्नी आणि कुटुंबीयांनी मला सतत प्रोत्साहन दिलं. मी जास्त काळ या गोष्टीचा विचार करू शकलो नाही. कारण त्याचा माझ्या आयपीएल फॉर्मवर परिणाम झाला असता," असंही चहलने सांगितलंय.
काही दिवसांपूर्वीच युझवेंद्र चहलने भारताचा नवा टी-20 कर्णधार रोहित शर्माला मोठा भाऊ म्हणून संबोधलं होतं. चहलने एका मुलाखतीत म्हटलं की, त्याचं आणि रोहितचं नातं भावासारखं आहे. रोहितची पत्नी रितिकाही त्याला आपला लहान भाऊ मानते.
युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचा खेळाडू मानला जातो. दोघेही आरसीबीमध्ये एकत्र खेळतात, त्यामुळे त्यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. मात्र सिलेक्टर्सने युझवेंद्र चहलला टी-20 वर्ल्डकप संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.