ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघ्या एका दिवसाचा अवधी उरला आहे. येत्या पाच ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यान (England vs New Zealand) सलामीचा सामना खेळला जाणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर तब्बल 40 हजार लोकांना मोफत सामना पाहाण्याची योजना आखण्यात आली आहे.
ते 40 हजार कोण?
आता तुम्ही विचार करत असाल की मोफत सामना पाहाणारे हे चाळीस हजार लोकं आहेत तरी कोण? गुजराती पेपर दिव्य भास्करने दिलेल्या बातमीनुसार विश्वचषकाचा पहिला सामना मोफत पाहणाऱ्या 40 हजारांमध्ये सर्व महिला (Women) असणार आहेत. भारतीय जनता पक्षाने (BJP) यासाठी एक प्लान तयार केला आहे. प्रत्येक वॉर्डमधून 800 महिलांना विश्वचषकाचं तिकिट दिलं जाणार आहे. इतकंच नाही तर मोफत तिकिटांबरोबर या महिलांना खाण्या-पिण्याच्या गोष्टीही मोफत दिल्या जाणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडिअमची क्षमता
भारतातल्या मोठ्या स्टेडिअमपैकी नरेंद्र मोदी स्टेडिअम एक आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद शहरातील मोटेरोमध्ये सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेवमध्ये हे स्टेडिअम आहे. या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता जवळपास 132000 इतकी आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनअंतर्गत या स्टेडिअमचा कारभार चालतो. या मैदानावर कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामना खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी 2021ला या स्टेडिअमचं नाव सरदार पटेल स्टेडिअम बदलून नरेंद्र मोदी स्टेडिअम करण्यात आलं.
46 दिवस चालणार स्पर्धा
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. तब्बल 46 दिवस क्रिकेट चाहत्यांना चुरशीच्या सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. टीम इंडिया आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला खेळणार आहे. भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध दोन हात करेल. तर 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमने सामने येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा सामना रंगेल.
भारतीय संघाचं वेळापत्रक
8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया , चेन्नई
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान दिल्ली
14 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर vs न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर vs नेदरलँड , बंगळुरु