आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी हार्दिकचं पुनरागमन, धोनीला संधी नाही

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Aug 29, 2019, 09:43 PM IST
आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी हार्दिकचं पुनरागमन, धोनीला संधी नाही title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टीममध्ये हार्दिक पांड्याचं पुनरागमन झालं आहे. वर्ल्ड कपदरम्यान हार्दिक पांड्याला छोटी दुखापत झाली होती. वर्ल्ड कपनंतर लगेचच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी हार्दिकला या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली होती.

धोनीला मात्र या सीरिजसाठी संधी देण्यात आलेली नाही. वर्ल्ड कप संपल्यानंतर धोनी लष्कराच्या सेवेसाठी जम्मू काश्मीरला गेला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं त्याने बोर्डाला आधीच कळवलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठीही त्याची निवड न झाल्यामुळे धोनीच्या पुढच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनाही टी-२० सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनाही टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. 

ऑक्टोबर २०२०मध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी भारत एकूण २२ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळणार आहे. या वर्ल्ड कपच्या दृष्टीनेच टीम उभारण्याचा प्रयत्न निवड समिती करत आहे. 

टीम इंडिया 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टी-२० १५ सप्टेंबरला धर्मशाळामध्ये, दुसरी टी-२० १८ सप्टेंबरला मोहालीला आणि तिसरी टी-२० २२ सप्टेंबरला बंगळुरूमध्ये होणार आहे.