८५व्या वर्षी ७ हजार विकेट घेऊन क्रिकेटपटू निवृत्त

टी-२० क्रिकेटच्या जमान्यात खेळाडू टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेत असल्याचं आपण अनेकवेळ पाहिलं आहे.

Updated: Aug 29, 2019, 07:42 PM IST
८५व्या वर्षी ७ हजार विकेट घेऊन क्रिकेटपटू निवृत्त title=

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या जमान्यात खेळाडू टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेत असल्याचं आपण अनेकवेळ पाहिलं आहे. पण वेस्ट इंडिजमधल्या एका क्रिकेटपटूने चक्क वयाच्या ८५व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. सेसील राईट असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. सेसील राईट यांनी त्यांच्या ६० वर्षांपेक्षा जास्तच्या कारकिर्दीत तब्बल ७ हजार विकेट घेतल्या आहेत. फास्ट बॉलर असलेल्या सेसील राईट यांनी जमैकाकडून बारबाडोसविरुद्धच्या मॅचमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी बारबाडोसच्या टीममध्ये वेस हॉल आणि सर गार्फिल्ड सोबर्स हे दिग्गज होते.

१९५९ साली सेसील राईट इंग्लंडला रवाना झाले. इंग्लंडमध्ये राईट सेन्ट्रल लॅन्कशायर लीगमध्ये क्रॉम्पटन या टीमकडून खेळले. १९६२ साली राईट यांनी इंग्लंडमध्ये राहूनच व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

'मी इतके वर्ष कसं खेळलो, ते मलाही माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया सेसील राईट यांनी डेली मिररशी बोलताना दिली. खाण्याविषयीही राईट यांनी भाष्य केलं. 'खरं सांगायचं तर मी सगळं खातो, फक्त जास्त दारू पित नाही. कधीतरी बियर घेतो,' असं राईट म्हणाले.

'भरपूर व्यायाम करून फिट राहतो, पण वयाचं कारण देत हल्ली मी व्यायामही कमी केला आहे. खेळात सक्रीय असल्यामुळे शारिरिक वेदना आणि त्रास कमी होतो. नुसतं बसणं आणि टीव्ही बघणं मला पसंत पडत नाही. चालायला मला जास्त आवडतं,' असं राईट यांनी सांगितलं.

७ सप्टेंबरला अपरमिल आणि स्प्रिंगहेड यांच्यातल्या मॅचनंतर सेसील राईट क्रिकेटला अलविदा करणार आहेत.