गौतम गंभीरची कारकिर्द जिथून सुरु झाली तिथेच संपणार

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

Updated: Dec 4, 2018, 10:43 PM IST
गौतम गंभीरची कारकिर्द जिथून सुरु झाली तिथेच संपणार title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. २००७ सालची टी-२० वर्ल्ड कप फायनल आणि २०११ सालची वर्ल्ड कप फायनल या दोन्ही मॅचमध्ये गंभीर भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. या दोन्ही ऐतिहासिक मॅचच्या विजयाचा शिल्पकार गौतम गंभीरच होता. दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये गुरुवारपासून फिरोजशाह कोटला मैदानात रणजी मॅच सुरु होत आहे. ही मॅच गंभीरची शेवटची मॅच असेल. याच मैदानातून गंभीरनं त्याच्या क्रिकेटला सुरुवात केली होती.

आंध्र प्रदेशविरुद्ध ६ डिसेंबरपासून सुरु होणारी मॅच माझी शेवटची असेल. माझ्या क्रिकेटचा प्रवास याच मैदानातून सुरु झाला होता आणि इकडेच संपणार आहे. पुढच्या जन्मीही मला क्रिकेटपटू बनून भारताकडून खेळण्याची इच्छा असल्याचं गंभीर म्हणाला.

गंभीरनं भारतासाठी खेळताना त्याच्या दिल्लीच्या टीममधलाच सहकारी वीरेंद्र सेहवागसोबत यशस्वी ओपनिंग पार्टनरशीप केली. या दोघांनी ४,४१२ रन केले. भारतासाठी हे रेकॉर्ड आहे. न्यूझीलंडमध्ये जिंकलेली सीरिज आणि ऑस्ट्रेलियातल्या सीबी सीरिजमधला विजय ही माझ्या कारकिर्दीतलं सगळ्यात मोठं यश असल्याचं गंभीर म्हणाला.

निवृत्तीचा निर्णय हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय होता. अनेक दिवसांपासून ती वेळ आता आली आहे असं मला वाटत होतं. क्रिकेट कारकिर्दीमध्ये मला मदत करणाऱ्या सगळ्यांचे धन्यवाद, असं वक्तव्य गंभीरनं केलं आहे. फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करून गंभीरनं त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.

गंभीरनं या व्हिडिओमध्ये भारतीय टीम, आयपीएल टीम कोलकाता आणि दिल्ली, दिल्लीची रणजी टीममधले सहकारी, प्रशिक्षक आणि लहानपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज, पार्थसारथी शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जस्टिन लँगर यांचे आभार मानले आहेत.

२०११ सालच्या श्रीलंकेविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये गौतम गंभीरनं १२२ बॉलमध्ये ९७ रन केले. तर २००७ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरनं ५४ बॉलमध्ये ७५ रनची तडाखेबाज खेळी केली होती. या दोन्ही मॅचमध्ये गंभीर भारताचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता.

गौतम गंभीर काहीच दिवसांपूर्वी ३७ वर्षांचा झाला होता. भारतीय टीममध्ये निवड होत नसल्यामुळे त्याच्या क्रिकेटमधल्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर गंभीरनं निवृत्तीचा निर्णय घेतला. गौतम गंभीरनं ५८ टेस्ट, १४७ वनडे आणि ३७ टी-२० मॅच खेळल्या. गौतम गंभीर टीममध्ये असताना भारतानं २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला. या दोन्ही वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीर भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.