T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून, भारताने बांगलादेशविरोधात सराव सामना खेळल्यानंतर तयारी सुरु केली आहे. 5 जूनला नेदरलँडविरोधात भारत पहिला सामना खेळणार असून यशस्वी जैसवालला वगळलं जाण्याची शक्यता असून तसे संकेत देण्यात आले आहेत. आघाडीच्या फलंदाजीसाठी उजवं-डावं फलंदाजी कॉम्बिनेशन हवं अशा चर्चा झालेल्या असतानाही सराव सामन्यात यशस्वी जैसवालला वगळून संजू सॅमसनला संधी देण्यात आली. विराट कोहली न्यूयॉर्कमध्ये उशिरा दाखल झाल्याने हा सामना खेळू शकला नव्हता. पण वर्ल्डकपमध्ये तो रोहितसह ओपनिंग करेल हे जवळपास निश्चित आहे.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा ओढत जबरदस्त कामगिरी केलेली असतानाही भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने त्याला पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याला विरोध केला आहे. विराटने आयपीएलमध्ये 15 डावात 741 धावा केल्या आहेत.
इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना यशस्वी जैसवालला प्लेईंग 11 मधून का वगळू नये यावर आपलं मत मांडलं आहे. यावेळी त्याने राहुल द्रविडला थेट इशारा देत सांगितलं आहे की, भारताकडे गोलंदाजीसाठी फारसे पर्याय नाहीत. यशस्वी जैसवालने भारतीय संघ आणि राजस्थान रॉयल्ससाठी नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामुळे शिवम दुबेसह त्यालाही खेळवलं पाहिजे.
“निवडलेल्या संघासह, दोन कॉम्बिनेशन असू शकतात. एकात तुम्ही फलंदाजीची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी अक्षर पटेलसह 6 गोलंदाजांसह खेळू शकता. दुसरीकडे, तुम्ही चार आघाडीच्या गोलंदाजांसह खेळू शकता आणि शिवम दुबे व हार्दिक पांड्याकडून गोलंदाजी करण्याची अपेक्षा करु शकता. भारतीय संघासाठी दुसरा पर्याय म्हणजे नेटमध्ये गोलंदाजी करणारा पण सामन्यांमध्ये गोलंदाजी न करणारा युवा खेळाडू, यशस्वी जैस्वाल आहे. शिवम दुबेने देखील आयपीएल दरम्यान नियमितपणे नेटमध्ये गोलंदाजी करत असल्याचं सांगितलं होतं, विश्वचषकात एक किंवा दोन षटके टाकण्याची तयारी करत असल्याचं तो म्हणाला होता,” असं इरफान पठाणने भारताच्या गोलंदाजीवर बोलताना सांगितलं.
"जर हार्दिकने 3 ते 4 ओव्हर्स टाकल्या तर ही समस्या बऱ्यापैकी सुटू शकते. रोहित, विराट आणि सूर्यकुमारसारखे फलंदाजी गोलंदाजी करु शकत नाही ज्यामुळे आपण काहीसे अपंग झाले आहेत. यापैकी एकजण गोलंदाजी करु शकला असता तर संघाला फायदा झाला असता. ऑस्टेलियासह इंग्लंड संघातही एकापेक्षा एक अष्टपैलू खेळाडू आहेत. जास्तीत जास्त गोलंदाजी पर्याय असणं कधीही चांगलं आहे. या स्थितीत आपण नक्कीच अपंग आहोत," असं त्याने म्हटलं.
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरही या चर्चेत सहभागी होता. भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंची कमतरता ही एकमेव कमकुवत बाजू आहे असं त्याने अधोरेखित केलं. तो म्हणाला की, "अष्टपैलू खेळाडूंची कमतरता भारतीय संघाची कमकुवत बाजू आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया संघाकडे पाहिलं तर मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरुन ग्रीन एका सामन्यात 4 ओव्हर्स टाकू शकतात. त्यामुळेच भारतीय संघाने शिवम दुबेला संघात स्थान दिलं आहे, जेणेकरुन अष्टपैलूंची उणीव भासणार नाही. ही तशी छोटी समस्या आहे, पण आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअरमुळे ही वाढू शकते. आपण सध्या तज्ज्ञ गोलंदाज आणि फलंदाजांवर अवलंबून आहोत, परंतु या विश्वचषकात संघाला काही तडजोड करावी लागेल आणि एखाद्याला सामन्यात किमान दोन ते तीन षटके टाकावी लागतील".