नेपियर : संघामध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू हा नेहमीच प्रत्येक कर्णधाराला हवा हवासा असतो. अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघाचं संतुलनही व्यवस्थित राहतं. बॉलिंग असो बॅटिंग असो किंवा फिल्डिंग, अष्टपैलू खेळाडू तिन्ही भूमिका चोख बजावतो. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूचं संघातील स्थान महत्त्वाचं मानलं जातं. गेल्या दोन वर्षांपासून हार्दिक पांड्या भारतासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. पण कॉफी विथ करण या शोमध्ये महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हार्दिक पांड्याचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पांड्या कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाही. पांड्याची चौकशी लांबली तर त्याला वर्ल्ड कपलाही मुकावं लागू शकतं.
महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पांड्या आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून परत यावं लागलं होतं. भारत आणि न्यूझीलंडमधल्या एकदिवसीय मालिकेला बुधवार २३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही मालिका सुरु होण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं हार्दिक पांड्याच्या टीममध्ये नसण्याची खंत बोलून दाखवली.
हार्दिक पांड्या नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा फास्ट बॉलर म्हणून खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली, पण या दोघांना उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
संघामध्ये अष्टपैलू खेळाडू नसल्यामुळे तिसऱ्या फास्ट बॉलरला मजबुरी म्हणून खेळवावं लागतं. अष्टपैलू खेळाडू नसतो तेव्हाच तिसरा फास्ट बॉलर खेळवण्याची परिस्थिती निर्माण होते, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं आहे.
विजय शंकर किंवा हार्दिकसारखे खेळाडू जेव्हा संघात नसतात तेव्हा तिसरा फास्ट बॉलर खेळवण्याची गरज भासते. संघात अष्टपैलू खेळाडू असेल, तर तो तिसऱ्या बॉलरची भूमिका बजावतो. तिसऱ्या बॉलरनं ताशी १४० किमीच्या वेगानं बॉलिंग करणं गरजेचं नसतं, असं विराट न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी म्हणाला. हार्दिकच्या अनुपस्थितीमध्ये अष्टपैलू विजय शंकरची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
पांड्यासारखा खेळाडू संघात नसतो, तेव्हाच मी तीन फास्ट बॉलरचं समर्थन करतो. पांड्यासारखा खेळाडू संघात असताना तिसरा फास्ट बॉलर खेळवण्याचा विचार केला जात नाही, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली.
धोनीनंही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूचं महत्त्व सांगितलं आहे. यशस्वी संघामध्ये किमान दोन ते तीन अष्टपैलू खेळाडू असतातच. अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघाला बॉलिंगसाठी पर्याय मिळतो, असं धोनी म्हणाला.
न्यूझीलंडमधली मालिका जिंकणं महत्त्वाचं आहे. पण आगामी वर्ल्ड कप लक्षात घेता संघ जोडणीबाबत लवचिकता दाखवावी लागेल. जिंकणं महत्त्वाचं आहे, पण अतिउत्साही असून चालणार नाही. ड्रेसिंग रुममध्ये चांगलं वातावरण असणं गरजेचं आहे. वर्ल्ड कपआधी संघात धैर्य आणि सामूहिक प्रयत्न गरजेचं असल्याचं कोहलीला वाटतंय. या मालिकेमध्ये काही खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असं म्हणत कोहलीनं शुभमन गिलच्या खेळण्याचेही संकेत दिले आहेत.