दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव

भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं २४ ऑगस्टला निधन झालं.

Updated: Aug 27, 2019, 05:30 PM IST
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव title=

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं २४ ऑगस्टला निधन झालं. अरुण जेटली हे डीडीसीए म्हणजेच दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्षही होते. त्यामुळे दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानाला अरुण जेटली यांचं नाव देण्यात येणार आहे. १२ सप्टेंबरला एका कार्यक्रमात हे नामकरण होणार आहे. तसंच या मैदानातल्या स्टॅण्डला विराट कोहलीचं नाव देण्यात येणार आहे. याआधीच विराटच्या नावाच्या स्टॅण्डची घोषणा करण्यात आली होती.

'अरुण जेटलींच्या प्रोत्साहनामुळेच विराट कोहली, सेहवाग, गंभीर, नेहरा, ऋषभ पंत यांच्यासारखे खेळाडू भारताकडून खेळले,' अशी प्रतिक्रिया डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिली. डीडीसीएचे अध्यक्ष असताना जेटलींनी स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा आणल्या. जेटलींच्या काळात डीडीसीएमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची ड्रेसिंग रुम उभारण्यात आली. तसंच स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमताही वाढवण्यात आली.

अरुण जेटली १९९९ पासून २०१३ पर्यंत डीडीसीएचे अध्यक्ष होते. स्टेडियम नामांतराच्या या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह आणि खेळ मंत्री किरण रिजिजूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

याआधी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने यमुना स्पोर्ट्स कॉम्पलेक्सला अरुण जेटलींचं नाव द्यावं, अशी मागणी केली. या मागणीचं पत्र गंभीरने दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांना पाठवलं. 'अरुण जेटलींसाठी आमच्या सगळ्यांच्या मनात सन्मान आहे. जेटलींनी आमच्या मनात राहावं, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे युमना स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचं नाव बदलून अरुण जेटली स्पोर्ट्स कॉम्पलेक्स करण्यात यावं,' असं ट्विट गंभीरने केलं होतं.