दुबई : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्डकपचा महामुकाबला खेळवला जाणार आहे. मात्र या मोठ्या सामन्याआधी, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने हार मानलेली दिसतेय. टीम इंडियाबद्दल त्याने केलेल्या एका टिप्पणीने खळबळ उडाली आहे. शाहीद आफ्रिदीला पाकिस्तानी टीव्ही चॅनेल समा टीव्हीवर विचारण्यात आलं की या सामन्यात कोणाचं वर्चस्व असेल, तेव्हा त्याने भारताला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटलंय.
शाहिद आफ्रिदी टीम इंडियाबद्दल म्हणाला, "या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय संघ दबाव हाताळण्यात पटाईत आहे. टीम इंडिया गेली 10-15 वर्षे चांगला खेळतंय. या सामन्यात ज्या संघाची मानसिकता चांगली असेल, तो जिंकेल.
आफ्रिदी पुढे म्हणाला, "टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकिस्तानला त्यांचे 100% द्यावे लागेतील. दबावावर मात केल्यानंतरच पाकिस्तानला भारतावर विजयाची नोंद करता येईल. परिणामांची पर्वा न करता पाकिस्तानने क्रिकेटचा पूर्ण आनंद घ्यावा आणि त्यांचे 100% द्यावे."
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नेहमीच वरचढ राहिली आहे. 1992 च्या एकदिवसीय वर्ल्डकपपासून सुरू झालेला विजयाचा सिलसिला आजही कायम आहे. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 7 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला 5 वेळा हरवलं आहे. म्हणजेच एकूणच भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 12 वेळा विजय मिळवला आहे.
भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेत 17 पैकी 13 सामने पाकिस्तानविरुद्ध जिंकले. पाकिस्तानला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत, तर एक सामना बरोबरीत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 50 ओव्हर्सच्या विश्वचषकातील सातंही सामने जिंकले आहेत.