मुंबई : पुढचा टी-२० वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाणार आहे. २०२० साली १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाईल. या वर्ल्ड कपआधीच वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर खेळाडू ड्वॅन ब्राव्होने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राव्होने २०१८ साली निवृत्ती घ्यायची घोषणा केली होती, पण सप्टेंबर २०१६नंतर तो वेस्ट इंडिजकडून खेळला नव्हता.
'मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा करत आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये प्रशासकीय सुधारणा झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. मी टी-२० क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे, असं मला निवड समितीला सांगायचं आहे,' असं ब्राव्हो म्हणाला आहे.
एक वर्षाआधीच ब्राव्होने निवृत्ती मागे घेण्याचे संकेत दिले होते. वेस्ट इंडिजकडून पुन्हा खेळण्याची इच्छा ब्राव्होने व्यक्त केली होती. वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्ध ३-०ने विजय मिळवल्यानंतर लिहिलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ब्राव्होने ही गोष्ट बोलून दाखवली होती.
ब्राव्होने वेस्ट इंडिजकडून ४० टेस्ट, १६४ वनडे आणि ६६ टी-२० मॅच खेळल्या आहेत. सगळ्या फॉरमॅटमध्ये ब्राव्होने ६,३१० रन केले आणि ३३७ विकेट घेतल्या आहेत. तर टी-२० लीगमध्ये ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्स, लाहोर कलंदर्स, मेलबर्न रेनेगेड्स, त्रिनबागो नाईट रायडर्स आणि विनिपेग हॉक्स या टीमकडून खेळतो. याशिवाय ब्राव्हो नुकत्याच अबू धाबीमध्ये झालेल्या टी-१० लीगमध्येही सहभागी झाला होता.
ब्राव्हो त्याची शेवटची वनडे २०१४ साली भारताविरुद्ध धर्मशालामध्ये खेळला होता. वेस्ट इंडिज टीमचे त्यांच्या बोर्डासोबत वेतनावरुन वाद झाल्यामुळे टीमने भारत दौरा अर्धवट सोडला होता. त्यावेळी ब्राव्हो वेस्ट इंडिजचा कर्णधार होता. यानंतर ब्राव्होला २०१५ वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला होता. २०१६ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ब्राव्होचं टीममध्ये पुनरागमन झालं. वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकवण्यात ब्राव्होने महत्त्वाची भूमिका बजावली होती.