'धोनीची वेळ संपली; आता नव्या पर्यायाची गरज'

एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

Updated: Sep 20, 2019, 12:13 PM IST
'धोनीची वेळ संपली; आता नव्या पर्यायाची गरज' title=

मुंबई : एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. वर्ल्ड कप संपल्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये धोनीची निवड झाली नाही. त्यामुळे आता धोनीचं भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी यावर त्यांचं मत मांडलं आहे.

'धोनीची वेळ संपली आहे. टीम इंडियाला आता नव्या पर्यायाची गरज आहे. धोनीबद्दल माझ्या मनात आदर आहे, त्यामुळे टीम बाहेर काढण्याआधीच धोनीने निघून जावं,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनाही धोनीच्या निवृत्तीचा प्रश्न विचारण्यात आला होता, पण याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मात्र धोनीला पाठिंबा दिला आहे. 'तुम्हाला आवडो अथवा नाही, पण अनुभव हा महत्त्वाचा असतो. खेळाडूंच्या बाबतीत अनेकवेळा अपेक्षा सोडून दिल्या जातात, पण ते खेळाडू सगळ्यांना चुकीचं सिद्ध करतात. धोनीनेही त्याच्या कारकिर्दीत अनेकवेळा स्वत:ला सिद्ध केलं आहे. तरुणांना तयार करण्याची धोनीची मानसिकता आहे,' असं विराट म्हणाला होता.

'खेळाडूने निवृत्ती कधी घ्यावी? हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. दुसऱ्या कोणाचंही याबाबत मत असू नये, असं मला वाटतं. जोपर्यंत धोनी उपलब्ध आहे आणि त्याला खेळायचं आहे, तोपर्यंत तो टीमसाठी मोलाचा आहे,' असं वक्तव्य विराटने केलं.