टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर, लवकरच चित्रपट प्रदर्शित

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

Updated: Jun 7, 2020, 06:43 PM IST
टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर, लवकरच चित्रपट प्रदर्शित title=

मुंबई : टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग त्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. खुद्द हरभजन सिंगने सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं आहे. तामीळ भाषेतला चित्रपट 'फ्रेंडशिप'मध्ये हरभजन सिंग दिसणार आहे. हा चित्रपट तामीळसोबतच हिंदी आणि पंजाबी भाषेतही डब केला जाण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.

जवळपास ४ वर्षांपासून भारतीय टीममधून बाहेर असलेला हरभजन सिंग त्याचा पहिला चित्रपट दक्षिणेतला ऍक्शन हिरो अर्जुनसोबत करत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि श्याम सूर्या यांनी केलं आहे. चित्रपटात हरभजन कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण चित्रपटातलं पोस्टर बघता हरभजनची भूमिका महत्त्वाची असेल, असं बोललं जातंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#friendshipmovie

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

कॅमेरासमोर येण्याची हरभजन सिंगची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जाहिरातींसाठीही हरभजन कॅमेराला सामोरा गेला होता. ३९ वर्षांचा हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. याचाही त्याला चित्रपटासाठी फायदा झाला. चेन्नईसाठी चांगली कामगिरी केल्यामुळे हरभजनचे तामीळनाडूमध्ये समर्थक वाढले. तसंच हरभजन तामीळ भाषाही शिकला. अनेकवेळा हरभजन तामीळ भाषेतून ट्विटही करतो. 

हे क्रिकेटपटूही चित्रपटात दिसले

हरभजन सिंगच्या आधी अनेक क्रिकेटपटूंनी चित्रपटात आपलं नशीब आजमावलं. एस.श्रीसंत मल्ल्याळम चित्रपटात हिरो म्हणून दिसला होता. माजी फास्ट बॉलर सलिल अंकोला आणि बॅट्समन अजय जडेजा, विनोद कांबळी यांनीदेखील चित्रपटात काम केलं. सुनिल गावसकर हेदेखील नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसले. 

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, कपिल देव, सैय्यद किरमाणी, युवराज सिंगचे वडिल आणि ऑलराऊंडर असलेले योगराज सिंग यांनीही चित्रपटात अभिनय केला. योगराज सिंग यांचा करिश्मा पंजाबीपासून ते हिंदी चित्रपटांमध्येही दिसला.