आयपीएलच्या आयोजनासाठी हा देश तयार, बीसीसीआयला दिला प्रस्ताव

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. 

Updated: Jun 7, 2020, 05:55 PM IST
आयपीएलच्या आयोजनासाठी हा देश तयार, बीसीसीआयला दिला प्रस्ताव title=

दुबई : कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचं आयपीएल आता कधी आणि कुठे होणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण युएईच्या अमिरात क्रिकेट बोर्डाने आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. आयपीएलचा १३ वा मोसम मार्च महिन्यात सुरू होणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलली गेली.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार युएई क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. 'युएईमध्ये याआधीही आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं, तसंच द्विदेशीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धाही युएईमध्ये खेळवल्या गेल्या', असं युएई बोर्डाचे महासचिव मुबाशशिर उस्मानी म्हणाले आहेत. 

'इंग्लंड क्रिकेट बोर्डालाही आम्ही मोसमाच्या उरलेल्या मॅच खेळवण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. इंग्लंड आणि भारत या दोन्ही बोर्डांना आम्ही प्रस्ताव दिला आहे. दोघांपैकी कोणत्याही बोर्डाने याचा स्वीकार केला, तर आम्हाला आनंद होईल,' अशी प्रतिक्रिया मुबाशशिर उस्मानी यांनी दिली.

याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आयपीएलच्या आयोजनासाठी आपण उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्यात आला, तर आयपीएलचं आयोजन होईल, असं बोललं जातंय. टी-२० वर्ल्ड कपबाबत १० जूनला आयसीसीची बैठक आहे. या बैठकीमध्ये वर्ल्ड कपचं भवितव्य ठरवलं जाईल. यानंतरच आयपीएलबाबत निर्णय घेण्यात येईल.