सिराजनंतर बूम बूम बुमराहचा दणका, केपटाऊन कसोटीत अनेक विक्रम केले नावावर

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल सहा विकेट घेतल्या. या कामगिरीबरोबरच बुमराहने अेक विक्रम आपल्या नावार केले. 

राजीव कासले | Updated: Jan 4, 2024, 05:22 PM IST
सिराजनंतर बूम बूम बुमराहचा दणका, केपटाऊन कसोटीत अनेक विक्रम केले नावावर title=

Jasprit Bumrah Records: दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team Inddia) ऐतिहासिक विजय मिळवला. या शानदार विजयाजे हिरो ठरले ते भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमरहा (Jasprit Bumrah). सामन्याच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सहा विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला दणका दिला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये बूम बूम बुमराहने सहा विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं मोडलं. सिराज आणि बुमराहच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात विकेटने विजय मिळवला. दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर अॅडम मार्करमने एकाकी झुंज दिली. त्याने 106 धावा केल्या. (India Beat South Africa)

बुमराहचा दणका
जसप्रीत बुमराहने या सामन्यात सहा विकेट घेत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नलाही त्याने मागे टाकलं. न्यूलँडसमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराह शेन वॉर्नच्या एक पाऊल पुढे गेला आहे. बुमराहने न्यूलँडसमध्ये 18 विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे. तर या मैदानावर वॉर्नच्या 17 विकेट होत्या. 

न्यूलँड्समध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

25 - कॉलिन बेलीथ (इंग्लंड)
18 - जसप्रीत बुमराह (भारत)
17 - शेन वार्न (ऑस्ट्रेलिया)
16 - जेम्स एंडरसन (इंग्लंड)
15 - जॉनी ब्रिग्स (इंग्लंड)

जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी
जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेत भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथच्या एका मोठ्या विक्रमासीही बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेत तीन वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी जसप्रीत बुमराहने केली याआधी भारताच्या जवागल श्रीनाथच्या नावावर हा विक्रम जमा होता. भारताच्या व्यंकेटेश प्रसाद, एस श्रीसंत आणि मोहम्मद शमीने दोनवेळा अशी कामगिरी केली आहे. 

3 - जवागल श्रीनाथ
3 - जसप्रीत बुमराह
2 - वेंकटेश प्रसाद
2 - एस श्रीसंत
2 - मोहम्मद शमी 

याबरोबरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीतही बुमराह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. महान गोलंदाज अनिल कुंबळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. कुंबळेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल 45 विकेट घेतल्या आहेत. तर जवागल श्रीनाथच्या नावावर 43 विकेट आहेत.

45 - अनिल कुंबले
43 - जवागल श्रीनाथ
38 - जसप्रीत बुमराह
35 - मोहम्मद शमी
30 - जहीर खान