Sarfaraz Khan Half-Century : टीम इंडियाचा मधल्या फळीतील आक्रमक युवा फलंदाज सर्फराज खानने धर्मशाला कसोटीच्या (Dharmshala Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसी तुफानी फटकेबाजी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सर्फराजने (Sarfaraz Khan) सावध सुरुवात केली. पण मैदानावर जम बसताच त्याने आपलं आक्रमक रुप दाखवलं. सर्फराज खानने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडची चांगलीच पिसं काढली. आपल्या खेळीत सर्फराजने तुफान फटकेबाजी केली. सर्फराज 56 धावांवर बाद झाला.
सर्फराजचं सलग तिसरं अर्धशतक
धर्मशाला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात सर्फराज खानने 50 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील सर्फराजचं हे तिसरं अर्धशतक (Half Century) ठरलंय. सर्फराजने 8 चौकार आणि 1 षटकार मारत 56 धावा केल्या. शोएब बशीरने त्याची विकेट घेतली. अर्धशतकी खेळीत सर्फराजने लक्ष्यवेधी फटके मारले. मार्क वूडच्या षटकात सर्फराजने तीन चौकार आणि 1 षटकार मारला. तर टॉम हार्टलीच्या एका ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले.
सुरुवातीला सर्फराज खानने 30 चेंडूत केवळ 9 धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या 75 व्या षटकात टॉम हार्टलीच्या गोलंदाजीपासून सर्फराज खान आपल्या मूळ रुपात आला. हार्टलीच्या षटकात त्याने दोन चौकार मारत सुरुवात केली. त्यानंतर मार्क वूडच्या एका षटकात त्याने दोन चौकार मारले. त्यानंतर मात्र सर्फराज थांबला नाही. त्याने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर चौकार मारत सर्फराजने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
देवदत्त पडिक्कलचंही अर्धशतक
दुसरीकडे धर्मशाला कसोटीत पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलनेही पहिल्यात डावात अर्धशतक पूर्ण केलं. पडिक्कलने 103 चेंडूत दहा चौकार आणि 1 षटकार मारत 65 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलाही शोएब बशीरने बाद केलं.
दिवसअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत
धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट गमावत 473 धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडियाने तब्बल 255 धावांची आघाडी घेतली आहे. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने 57 धावा केल्या. तर रोहित शर्मा 103 आणि शुभमन गिल 110 धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्लने 65 तर सर्फराज खानने 56 धावा केल्या. ध्रुव जुरेल 15 धावांवर बाद झाला. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. दिवसअखेर कुलदीप यादव 27 तर जसप्रीत बुमराह 19 धावांवर नाबाद आहेत.