Rohit Sharma: बेन स्टोक्सने 9 महिन्यांनी केली गोलंदाजी; पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा फसला

Ben Stokes Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आतापर्यंत गोलंदाजी केली नव्हती. गेल्या काही काळापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 8, 2024, 05:02 PM IST
Rohit Sharma: बेन स्टोक्सने 9 महिन्यांनी केली गोलंदाजी; पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा फसला title=

Ben Stokes Rohit Sharma : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालामध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक ठोकलं. 103 रन्सवर रोहित शर्माने त्याची विकेट गमावली. यावेळी इंग्लंडच्या कर्णधारानेच भारताच्या कर्णधाराची विकेट काढली. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आतापर्यंत गोलंदाजी केली नव्हती. गेल्या काही काळापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं. यामुळे त्याला गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र धर्मशालामध्ये बेन स्टोक्सने गोलंदाजी केली आणि थेट रोहित शर्माची विकेट काढली. 

लंच टाईमनंतर पुन्हा खेळ सुरू होताच तो बॉल हातात घेऊन गोलंदाजीला उतरला. बऱ्याच काळानंतर टाकलेल्या पहिल्याच बॉलवर बेन स्टोक्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माला क्लिन बोल्ड आऊट केलं आणि त्याची शतकी खेळी संपवली.

तब्बल 9 महिन्यांनंतर केली गोलंदाजी

बेन स्टोक्सने यापूर्वी 2023 मध्ये जून महिन्यात शेवटच्या टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासमोर 2 विकेट्स घेतले होते. यानंतर स्टोक्सने स्वत:ला गोलंदाजीपासून दूर ठेवलं. पाचव्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने फलंदाजीचा मोर्चा सांभाळला. दोघांनीही खणखणीत शतकं ठोकली होती. मात्र अखेरीस लंचनंतर बेन स्टोक्सने रोहित शर्माची विकेट काढली.

रोहित शर्माही झाला आश्चर्यचकित

बेन स्टोक्स प्रदीर्घ काळानंतर कशी गोलंदाजी करतो याकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. या काळात जवळपास 9 महिने 7 सामने झाले होते. यावेळी शतक पूर्ण करणारा रोहित मात्र स्टोक्सच्या या बॉलवर आऊट झाला. स्टोक्सचा हा गुड लेन्थ बॉल होता, जो पडल्यानंतर आतमध्ये वळला. यावेळी रोहितच्या बॅटची कट लागली मात्र बॉल ऑफ स्टंपच्या वरच्या बाजूला आदळला. आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा स्वतः देखील आश्चर्यचकित झालेला दिसला. त्याने 162 बॉल्समघ्ये 103 रन्सची खेळी केली. 

रोहित-गिलची मजबूत खेळी

रोहित शर्माने 154 बॉल्समध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तर शुभमन गिलने 137 बॉल्समध्ये शतक ठोकलं. विशेष म्हणजे या टेस्ट सिरीजमधील दोघांचंही हे दुसरं शतक होतं. रोहित शर्मा 103 रन्सवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर शुभमन गिल 110 रन्स जेम्स एंडरसनच्या गोलंदाजीवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. गिलने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 5 सिक्स ठोकले. रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 48 वं शतकं होतं.