Team India T20 Captain : श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा (India Squad) केली आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया (Team India) तीन टी20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला एक आठवड्यांचा अवधी राहिला असताना बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केलीय. टी20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली आहे.
गौतम गंभीरचा पहिला मास्टर स्ट्रोक
टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे टी20 संघाचं नेतृत्व कोण सांभाळणार यावरुन चर्चा रंगली होती. टी20 कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचं नाव सर्वात आघाडीवर होतं. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतही हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार होता. त्यामुळे हार्दिक पांड्याच रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे सुद्धा हार्दिक पांड्या टी20 चा कर्णधार व्हावा यासाठी आग्रही होते. पण टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा मात्र हार्दिक पांड्याला विरोध होता. सततच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या संघातून बाहेर असतो, तसंच वर्कलोड मॅनेजमेंटच्या बाबतीतही तो कमी पडत असल्याचं मत गंभीरचं होतं. त्यामुळे कर्णधारपदासाठी गौतम गंभीरची पसंती सूर्यकुमारला होती. यावरुन जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये मतभेद असल्याचंही उघड झालं होतं. पण अखेर गौतम गंभीरच्या निर्णयापुढे जय शाह यांनी माघार घ्यावी लागली. श्रीलंका दौऱ्यात टी20 संघासाठी सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
टी20 संघात हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे, पण त्याच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. एकदिवसीय मालिकेतून त्याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.
रोहित-विराटही खेळणार
गौतम गंभीरच्या आदेशासमोर रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही झुकावं लागलं आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. श्रीलंका दौऱ्यातही रोहित-विराट खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. पण गौतम गंभीरने या दोघांनीही श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळावी अशी भूमिका मांडली. आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित आणि विराटची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा अमेरिकेत, तर विराट कोहील कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत होते. पण आता सुट्टी संपवून त्यांना श्रीलंका दौऱ्यात सहभागी व्हावं लागणार आहे.
गौतम गंभीरची पहिली कसोटी
टी20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. आता श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरच्या नव्या कार्यकाळाची सुरुवात होणार आहे.
श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.