मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका आता आयपीएल स्पर्धेलाही बसणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने आयोजित करायचे की नाहीत याबाबत सरकारनं आज आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सरकारनं सावध भूमिका घेतल्याचं कळतंय.
आयपीएल सामने पाहण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून आयपीएल सामन्यांच्या तिकिटांची विक्री करू नये, अशी भूमिका राज्य सरकार घेणार असल्याचं कळतंय.
आयपीएल सामने आयोजित करावेत, मात्र गर्दी टाळण्यासाठी तिकीट विक्री करू नये अशी सरकारची भूमिका आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार ही भूमिका घेण्याची शक्यता असून याबाबत सरकारकडून विधिमंडळात निवेदन केलं जाण्याची शक्यता आहे.
आयपीएल स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण अवलंबून असल्यानं स्पर्धा रद्द केल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो. स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाऊ शकतात. त्याचं टीव्ही चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होत असल्यानं प्रेक्षक घरी बसून सामने पाहू शकतात. त्यामुळे गर्दी टाळण्याचा तोडगा काढून ही स्पर्धा खेळवण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं.
२९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होत असून मुंबई आणि चेन्नई यांच्यात वानखेडे स्टेडियमवर पहिली लढत होणार आहे.