राज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.  

Updated: Mar 11, 2020, 12:35 PM IST
राज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय? title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, महत्वाचे मोठे कार्यक्रम आदीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. त्यातच आयपीएल सामन्यांबाबतचा निर्णयही अपेक्षित आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तशी माहिती दिली आहे.

२९ मार्चपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्यानं आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यानंतर आयपीएलचे अनेक सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच होणार आहेत. आयपीएल सामन्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. परदेशी खेळाडू, चिअर गर्ल्स, पर्यटक या स्पर्धेसाठी येत असतात. याशिवाय स्थानिक क्रिकेटप्रेमीही आयपीएल सामन्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळणं कठीण असल्यानं स्पर्धा पुढे ढकलणं किंवा मुंबईबाहेर सामने घेणं आदी पर्याय चाचपले जाऊ शकतात. स्पर्धेवर मोठं अर्थकारणही अवलंबून आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

0