ठरलं! 2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 'हा' दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य कोच? बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय

Gautam Gambhir Team India Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता वाढली आहे. यासाठी अनेक खेळाडूंची नावं आहेत. पण 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियातील खेळाडूला हा मान मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

राजीव कासले | Updated: May 28, 2024, 06:34 PM IST
ठरलं! 2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 'हा' दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य कोच? बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय title=

Team India Head Coach : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) कार्यकाळ संपणार असून नव्या प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे. प्रमुख प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज आहेत. यादरम्यान, प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे. सोमवारी म्हणजेच 27 मे पर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने (BCCI) अर्ज मागवले होते. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशीची डेडलाइन यासाठी देण्यात आली होती.

गौतम गंभीरचं पारडं जड
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत 2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील दिग्गज खेळाडू गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) पारडं जड आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या सतराव्या हंगामात गौतम गंभीर चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटोर होता. कोकेआरच्या विजयात गौतम गंभीरचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरचं नाव जवळपास निश्चित आहे. एका रिपोर्टनुसार बीसीसीआच्या बैठकीतही गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार आयपीएलमधल्या एका फ्रँचाईजच्या मालकाने याबाबत माहिती दिली आहे. यानुसार गौतम गंभीरच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. यासाठी बीसीसीआयबरोबर गंभीरची चर्चासुद्धा झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गौतम गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या मेंटॉर पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

केकेआरचं जेतेपद, गंभीरची रणनिती
कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटोर होण्याआधी गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटोर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली लखनऊने दमदार कामगिरी केली होती. पण गंभीरने संघ सोडताच लखनऊ संघाची कामगिरी घसरली. आयपीएल 2024 मध्ये लखनऊचा संघ प्ले ऑफही गाठू शकला नाही. तर गौतम गंभीर मेंटॉर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने थेट जेतेपद नावावर केलं. 

गंभीरचं दमदार आंतरराष्ट्रीय कारकिर्द
गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दही दमदार होती. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 147 एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याने 5238 धावा केल्यात. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गंभीरच्या नावावर 11 शतकं आणि 34 अर्धशतकं आहेत. तर 58 कसोटी सामन्यात गंभीरने  4154 धावा केल्यात. यात 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. गंभीरच्या नावावर एक दुहेरी शतकाचीही नोंद आहे. याशिवाय गंभीर भारतासाठी 37 टी 20 खेळलाय, यात त्याने 932 धावा केल्यात.