...म्हणून भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जाणं गरजेचं नाहीतर... 

Updated: Sep 21, 2019, 05:34 PM IST
...म्हणून भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर title=

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेमध्येच भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. या मुद्द्यावर आता बीसीसीआयही आक्रमक झाल्याचं दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये धरमशाला येथे पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर १६ सप्टेंबरला संघ मोहाली येथे पोहोचले होते. त्यावेळी त्यांना चंदीगढ पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. 

संघाला सुरक्षा न पुरवली जाण्याच्या या मुद्द्याला बीसीसीआयच्या एसीयू म्हणजे ऍन्टी करप्शन युनिटने उचलून धरलं आहे. शिवाय अशा प्रकारचा ढिसाळ कारभार आणि बेजबाबदार व्यवहार खपवून घेतला जाणार नाही अशी ताकीदही दिली आहे. 

थकित रक्कम न दिल्यामुळे सुरक्षा न पुरवल्याचं कारण चंदीगढ पोलिसांकडून देण्यात आलं. मोहालीमध्ये पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाला हॉटेलकडूनच सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच आली होती. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी चंदीगढ पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. हा सर्व प्रकार पाहता, एसीयू प्रमुख अजित सिंह यांनी मौदानात आणि मैदानाबाहेरही यजमान क्रिकेट व्यवस्थापन मंडळाना अशा प्रकारचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नसल्याची ताकीद दिली. 

सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार एका ईमेलच्या माध्यमातून य़ाविषयीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीमुसार, भविष्यातही हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कारण, सुरक्षेअभावी अनेकदा काही अडचणीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. अनेकदा चाहते त्यांच्या आवडच्या खेळाडूंना भेटण्यासाठी, त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी मैदानात येत असल्याचं चित्र त्यांनी स्पष्ट केलं. 

एसीयू प्रमुखांनी मोहाली येथील मैदानात दोन चाहते खेळपट्टीपर्यंत पोहोचल्याची बाब लक्षात घेत व्यवस्थापकीय मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेचा अहवालही मागितला आहे. शिवाय यासंबंधी करण्यात आलेल्या मेलमध्ये सुरक्षा कर्मचारी हे सीमारेषा आणि प्रेक्षकांदरम्यान उभे केले जावेत. शिवाय या सुरक्षा दल कर्मचाऱ्यांनी मैदानातील प्रेक्षकांच्या दिशेने चेहरा करुन उभं रहावं. लाँग ऑन, लाँग ऑफ, डीप फाईन लेग, डीप थर्ड मॅन, डीप मिड विकेट आणि डीप कव्हर अशा विविध ठिकाणीही सुरक्षा तैनात असावी, असे निर्देश दिले. 

मैदानात आले दोन चाहते आणि..... 

मोहाली येथे झालेल्या टी२० सामन्यामध्ये सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजीच्या वेळी काहीजणांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. एक चाहता आतमध्येही आला पण, सुरक्षा रक्षकांनी त्याचा पाठलाग करत त्याला मैदानाबाहेर आणलं. दुसऱ्या वेळी विराट कोहली फलंदाजी करत असतानाच, एक चाहता थेट मैदानात आला. तो विराटपर्यंतही पोहोचली. काही क्षणांसाठी विराटलाही काय सुरु आहे, याचा अंदाज लागला नाही. क्रिकेट सामन्यादरम्यान, असा प्रसंग ओढावला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, आता मात्र क्रिकेट खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता याविषयी काही सक्तीचे आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत.