मुंबई : दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे. पाकिस्तान दौऱ्यामध्ये श्रीलंका ३ टी-२० आणि ३ वनडे मॅच खेळणार आहे. पाकिस्तानच्या या दौऱ्यातून श्रीलंकेच्या महत्त्वाच्या १० प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे. दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने मात्र याबाबत भलताच दावा केला आहे. आयपीएलमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये यायला नकार दिला, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. पाकिस्तानचा दौरा केलात तर आयपीएलचा करार करणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोपही आफ्रिदीने केला आहे.
'आयपीएल टीमकडून श्रीलंकेवर दबाव आहे. याआधी पीएसएलवेळीही मी श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंशी बोललो होतो. त्यांना पीएसएलमध्ये खेळायचं होतं, पण तुम्ही पाकिस्तानमध्ये गेलात तर आयपीएलचा करार करणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं,' असं एका व्हिडिओमध्ये आफ्रिदी म्हणाला.
Shahid Afridi Srilankan Players who are not Going to Pakistan reason is IPL & IPL Franchise : @SAfridiOfficial pic.twitter.com/vc7ob32g3E
— Just a Fan (@iemRahul_) September 20, 2019
याआधी पाकिस्तान दौऱ्यावर न येणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंवर श्रीलंका बोर्डाने कारवाई करावी आणि त्यांच्याकडून दंड वसूल करावा, अशी मागणी जावेद मियांदाद यांनी केली होती.
२७ सप्टेंबरपासून श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला सुरुवात होणार आहे. २७ सप्टेंबरला पहिली वनडे, २९ सप्टेंबरला दुसरी आणि २ ऑक्टोबरला तिसरी वनडे खेळवण्यात येईल. यानंतर ५, ७ आणि ९ ऑक्टोबरला टी-२० मॅच होतील. तीन वनडे कराचीमध्ये तर टी-२० मॅच लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये होतील.
पाकिस्तान दौऱ्यात श्रीलंकेच्या टीमवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मिळाला होता. यानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने या दौऱ्याचा पुनर्विचार करा, असा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानमधल्या सुरक्षेची पाहणी केली. यानंतर संरक्षण मंत्रालयाने श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला परवानगी दिली.
२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमच्या बसवर गोळीबार केला होता. यात ६ खेळाडू जखमी झाले होते.